BirdFluNewsUpdate : देशात बर्ड फ्लूची धास्ती वाढली , काय आहेत लक्षणे ? मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश

Spread the love

अशी आहेत बर्ड फ्लू संक्रमणाची लक्षणे


श्वास घेण्यात अडचण, कफ कायम राहणं, डोकेदुखी, सर्दी, घशात सूज येणं, स्नायू दुखणं, उलट्या, ओटीपोटात दुखणे अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.


देशात बर्ड फ्लू विषाणूची धास्ती निर्माण झाली असून  १० राज्यांत बर्ड फ्लू संक्रमण अर्थात ‘एव्हियन एन्फ्लुएन्जा’ प्रसार होत असल्याचे निदर्शनास आले आहे . सोमवारी महाराष्ट्र, दिल्लीनंतर उत्तराखंडातही बर्ड फ्लूची पुष्टी करण्यात आली आहे. देशात आत्तापर्यंत केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरयाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्यांत बर्ड फ्लू आढळला असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री युद्ध ठाकरे यांनी बर्ड फ्लू संदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरू नये यासाठी प्रशासनाने नागरिकांना योग्य व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, असे निर्देश देतानाच माणसांमध्ये या रोगाचे संक्रमण होत नसल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. बर्ड फ्लू बाबत राज्यातील परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान येथील समिती सभागृहात घेतला. यावेळी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी बर्ड फ्लू संदर्भात आढावा घेऊन नंतर लगेचच राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व्हीसीद्वारे बर्ड फ्लू संक्रमण आणि घ्यावयाची काळजी या संदर्भात निर्देश दिले. या संदर्भातील निर्देशांची गांभीर्याने अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या रोगाचे तात्काळ निदान होण्याकरिता राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागासाठी जैवसुरक्षास्तर ३ ही अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. ज्या भागात बर्ड फ्लू रोगाची लागण नाही, अशा भागात अंडी व मांस ७० डीग्रीपेक्षा जास्त तापमानात शिजवून खाल्ल्यास काहीही धोका नसल्याचे नमूद करून याबाबत गैरसमज व अफवा पसरविण्यात येवू नयेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

दरम्यान बर्ड फ्लू बाबत माहिती आणि मदत मिळावी म्हणून ठाणे महानगरपालिकेकडूनही हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा टोल फ्री क्रमांक १८००२२२१०८ किंवा ०२२ – २५३७१०१० या क्रमांकावर पक्ष्यांच्या मृत्यूशी संबंधित तक्रारी दाखल करण्यासाठी नागरिक संपर्क साधू शकतात.

राजधानी दिल्लीत काय अवस्था आहे ?

राजधानी दिल्लीत बर्ड फ्लूच्या दशहतीदरम्यान दिल्लीच्या सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना दिशा-निर्देश जारी करण्यात आले आहे. बर्ड फ्लू संक्रमणाची माहिती देण्यासाठी एक आपात्कालीन हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे . नागरिकांनी २३८९०३१८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. जिवंत पक्षी आयात करण्यावरदेखील बंदी जाहीर करण्यात आली आहे. बर्ड फ्लू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून १९१६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

बंदी नाही , चिकन आणि अंडी योग्य पद्धतीनं शिजवून खाण्याचं आवाहन

देशात अनेक ठिकाणी पक्षांमध्ये बर्ड फ्लू संक्रमण आढळलं असलं तरी मानवांमध्ये मात्र अद्याप हे संक्रमण आढळून आलेलं नाही. याच पार्श्वभूमीवर बर्ड फ्लू संक्रमण रोखण्यासाठी राज्यांना कोंबड्यांची विक्री किंवा कुक्कुट उत्पादनांवर बंदी न घालण्याची विनंती केलीय. उपभोक्त्यांना चिकन आणि अंडी योग्य पद्धतीनं शिजवून खाण्याचं आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान संक्रमित पक्षी किंवा संक्रमित कोंबड्यांच्या संपर्कात आल्यास मानवांमध्ये हे संक्रमण पसरू शकतं. बर्ड फ्लू विषाणू डोळे, नाक आणि तोंडाद्वारे मानवाच्या शरीरात प्रवेश मिळवू शकतात. यावर उपाय म्हणजे, संक्रमित पक्षी किंवा मेलेल्या पक्ष्यांपासून लांब राहा. तसंच संक्रमित भागात प्रवेश करणं टाळा. चिकन – अंडी खाणं काही काळ टाळलेलंच बरं. किंवा मांसाहारी पदार्थ योग्य पद्धतीने शिजवून मगच  खा.

Leave a Reply

आपलं सरकार

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.