शहरात वाहन चोरांचा धुमाकुळ सुरूच : सहा दुचाकी लांबवल्या

Spread the love

औरंगाबाद शहरात वाहन चोरांचा धुमाकुळ सुरूच असून, विविध भागातून चोरांनी सहा दुचाकी लांबवल्या. या घटना पाटोदा, गारखेडा परिसर, वाळुज एमआयडीसी, हर्षनगर, औरंगपुरा आणि समर्थनगर भागात घडल्या. विशेष म्हणजे या घटना भरदिवसा घडल्या आहेत. त्यामुळे वाहन धारकांमध्ये भिती पसरली आहे. यातील काही दुचाकी तर अवघ्या अर्ध्या तासात चोरांनी लांबवल्याचे दिसून आले आहे.

अहमदनगर जिल्ह््यातील महेश दशरथ रहाणे (३४, रा. पोहेगाव, ता. कोपरगाव, ह. मु. देवगिरी सोसायटी, देवळाई चौक) हे ६ जानेवारी रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास औरंगपुरा भागातील देवगिरी बँकेत दुचाकीने (एमएच-१५-एफआर-४५४८) गेले होते. त्यावेळी त्यांनी बँकेसमोर दुचाकी उभी केली होती. बँकेत कामासाठी गेले असताना अवघ्या अर्ध्या तासात चोराने त्यांची दुचाकी लांबवली. यानंतर राहुल काळू अडागळे (२३, रा. गुरु साई रेसीडेन्सी, एएस क्लबच्या पाठीमागे, एमआयडीसी वाळुज) यांनी सोसायटीच्या पार्किंगमध्ये रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकी (एमएच-१५-एचडी-०३७९) उभी केली होती. चोराने मध्यरात्री त्यांची दुचाकी हँडल लॉक तोडून लंपास केली. दुस-या दिवशी ७ जानेवारी रोजी सय्यद मसीकउद्दीन सय्यद रफीकउद्दीन (५०, रा. मंजूरपुरा, हर्षनगर) यांनी सायंकाळी सातच्या सुमारास साबेर फंक्शन हॉलशेजारी दुचाकी (एमएच-२०-सीक्यू-५०९२) उभी केली होती. त्यांची दुचाकी अवघ्या पंधरा मिनिटात चोराने लांबवली. तसेच सायंकाळी पावणेसातच्या सुमारास महावीर सुभाष उखळकर (४०, रा. शिवाजीनगर, अकरावी योजना) यांनी गारखेडा परिसरातील रिलायन्स मॉलसमोर दुचाकी (एमएच-२०-सीएफ-९००३) उभी केली होती. त्यांची दुचाकी चोराने अवघ्या अर्ध्या तासात लांबवली. त्यानंतर ८ जानेवारी रोजी एक महिला पाटोदा गावातील बाबुराव परदेशी यांच्यासोबत पेरे चौकातील यशोदा इंजिनियरींग कंपनीत कामासाठी गेल्या होत्या. त्यावेळी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांनी कंपनीच्या पार्किंगमध्ये दुचाकी (एमएच-२०-एफएस-१३६८) उभी केली होती. त्यांची दुचाकी दोन तासात चोराने बनावट चावीच्या सहाय्याने लंपास केली. याशिवाय रविवारी विजय जगन्नाथ शिंदे (४१, रा. ब्राम्हण गल्ली, बेगमपुरा) यांनी समर्थनगरातील जोशी हॉस्पीटलजवळ रात्री नऊच्या सुमारास दुचाकी (एमएच-२०-ईबी-६७८२) उभी केली होती. त्यांची देखील दुचाकी दोन तासात चोराने लंपास केली. याप्रकरणी संबंधीत पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Leave a Reply

आपलं सरकार

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.