Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BhanadaraFire : बालकांच्या मृत्यू प्रकरणात आरोग्य मंत्र्यांचे कठोर कारवाईचे संकेत , चौकशी समितीला तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश

Spread the love

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जळीत प्रकरणातील बालकांच्या मृत्यूच्या घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून ही समिती शासनाला तीन दिवसात अहवाल सादर करेल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान बेफिकिरी दाखवणाऱ्या तसंच दोषी असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे संकेतही टोपे यांनी दिले आहेत.

या अग्निकांडाचे नेमके कारण, रुग्णालयाचे फायर एक्स्टींग्विश आणि इतरही सुरक्षात्मक बाबींचे ऑडिट अशा सर्व बाबींची ही समिती चौकशी करेल. या समितीत संबंधित विषयांचे तज्ज्ञ समाविष्ट करण्यात आले आहेत. स्ट्रक्चरल, फायर आणि एक्स्टींग्विश ऑडिट आणि रुग्णालयात नेमका स्फोट होण्याची कारणांबाबतही ही समिती शासनाला अहवाल सादर करेल, असे जिल्हा रुग्णालयातील घटनास्थळाची पाहणी करताना राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

या घटनेविषयी पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले की, ही घटना अतिशय दुर्दैवी आणि हृदयद्रावक आहे. मृत पावलेल्या बालकांच्या कुटुंबियांच्या भावना मी समजू शकतो. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी ही समिती गठित केली आहे. या घटनेशी संबंधित सर्व संबंधितांची तसेच प्रत्यक्षदर्शींचीही समितीसोबतच पोलिसांकडूनही चौकशी केली जाणार आहे. बेफिकीरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. या आपत्तीत तातडीने मदतकार्य करून इतर बालकांचा जीव वाचविणाऱ्या परिचारिका आणि वार्डबॉयचाही त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.

यावेळी नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम, आरोग्य उप संचालक डॉ. संजय जायस्वाल यावेळी उपस्थित होते. आपल्या भेटीत आरोग्यमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या दालनात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. भोजापूर येथील गीता विश्वनाथ बेहरे यांचे बाळ या घटनेत दगावले आहे. आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. टोपे यांच्या समवेत विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजीत कदम यांचीही उपस्थिती होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!