Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : कळीचा मुद्दा : चर्चेतली बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिले रोख ठोक उत्तर

Spread the love

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून राजकारण चांगलेच तापलेले असून यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला रोख ठोक उत्तर दिले आहे. महाआघाडी सरकारच्या अजेंड्यावर हा विषय नाही, असं म्हणत काँग्रेसने नामांतरला त्यांचा विरोध स्पष्ट केल्यानंतरही शिवसेनेकडून संभाजीनगर असा उल्लेख शासकीय पातळीवर होत राहिला आहे. त्यावरून मुख्यमंत्र्यांना छेडलं असता, उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच या वादावर त्यांची भूमिका जाहीर केली.

पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना औरंगाबादचा उल्लेख मुख्यमंत्री कार्यालाकडून अधिकृतपणे संभाजीनगर असा केला जात आहे, असं विचारल्यावर ठाकरे यांनी “हो मग त्यात वेगळं काय आहे,” असं म्हणत आपला पवित्रा दाखवला. ‘वर्षानुवर्षं आम्ही संभाजीनगर असाच उल्लेख करत आलो आहोत आणि पुढेही तेच करणार. बाळासाहेबांनीही हाच उल्लेख केला होता’, असं उद्धव ठाकरे म्हणाले. काँग्रेसने नामांतराला विरोध केला आहे. याची आठवण देताच ठाकरे म्हणाले, “औरंगजेब सेक्युलर नव्हता. त्यामुळे आमच्या कॉमन अजेंड्यामध्ये जो सेक्युलर शब्द आहे, त्यात औरंगजेब बसत नाही.” मुख्यमंत्र्यांच्या या थेट काँग्रेसविरोधी भूमिकेमुळे आता नव्या वादाची ठिणगी पडू शकते.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर काँग्रेसच्या मंत्र्याच्या फोटोसह औरंगाबादचा “संभाजीनगर” असा उल्लेख करण्यात आला आणि यावरून पुन्हा आघाडीचं अंतर्गत वातावरण तापलं आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी थेटपणे यावर राग व्यक्त करत संभाजीनगर उल्लेखावर आक्षेप नोंदवला आहे. औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली असल्यानेच पुन्हा नामांतराच्या विषयाला हवा दिली जात आहे. नामांतरासाठी सरकारने नियुक्त केलेल्या समितीने नामांतराचा निर्णय घेतल्यास हा बदल होईल. दरम्यान, आता मुख्यमंत्र्यांनी थेट औरंगजेब सेक्युलर नव्हता, असं विधान करून नव्या वादाला तोंड फोडलं आहे. शिवसेनेनी जून 1995 मध्ये पहिल्यांदा औरंगाबाद महानगरपालिकेत नामांतराचा प्रस्ताव मांडला होता आणि पासही करून घेतला होता पण काँग्रेसच्या नगरसेवकाने त्याला विरोध करत पहिल्यांदा उच्च आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!