Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : BhandaraFire : अरे रे !! हे काय झाले ? 10 नवजात बालकांचा मृत्यू , मातांच्या आक्रोशाने भंडारा हादरले !!

Spread the love

नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात शिशु केअर युनिटला आग लागल्यामुळे १० नवजात बाळांचा गुदमरून  मृत्यू झाला आहे. या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहे. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री नीतिनित गडकरी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

या घटनेची माहिती मिळताच बालकांच्या माता -पित्यांनी आणि कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. अवघ्या काही महिन्यांच्या आणि एक वर्ष होण्यासाठी काही दिवस शिल्लक असणाऱ्या बालकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने आपल्या पोटचं बाळ आता या जगात नाही, हे वृत्त कळताच रुग्णालय परिसरात शोककळा पसरली. दरम्यान रुग्णालयाकडून आपल्याला कोणत्याही प्रकारची स्पष्ट माहिती देण्यात येत नव्हती, अद्यापही पूर्ण माहिती दिली जात नाहीयं, बालकांना भेटूही दिलं जात नाहीयं त्यामुळं पालकांमध्ये आणि मृत बालकांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट आहे. काही पालकांना त्यांचं बाळ हयात आहे, की नाही याबाबतही स्पष्टोक्ती नाही. त्यामुळं त्यांच्या मनात वेगळाच काहूरही माजला आहे. सदर घटना ही रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळंच घडल्याचं म्हणत बालकांच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर आणि संबंधित डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या घटनेची माहिती मिळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशीही बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.

मृत बालकांच्या कुटुबियांच्या दु:खात सहभागी असल्याची भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. तसेच, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहितीही टोपे यांनी दिली. या प्रकरणाची सखोल चौकशी करतानाच दोषींवर कठोर करवाई केली जाईल आणि आगीच्या कारणांचा बोध घेऊन भविष्यात अशा घटना घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. “भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू वॉर्डमध्ये मध्यरात्री दीडच्या सुमारास आग लागली. शॉट सर्कीटमुळे आग लागल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. रात्री ड्युटीवर असलेल्या नर्स व वॉर्ड बॉय यांनी तातडीने खिडक्या, दरवाजे उघडली. या कक्षाच्या लगतच्या दुसऱ्या वॉर्डमधील बालकांना त्यांनी तातडीने हलविल्याने ७ बालकांना वाचविण्यात यश आले. पण या दुर्घटनेमुळे १० बालकांचा मृत्यू झाला असून त्यातील तिघांचा आगीत होरपळून तर अन्य सात बालकांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला”, अशी अधिकृत माहिती टोपे यांनी दिली.

रुग्णालयामध्ये नेमकं काय घडलं?

भंडारा जिल्ह्यातील या सामान्य रुग्णालयाच्या SNCU मध्ये एकूण १७ नवजात बालक दाखल होती.  शनिवारच्या मध्यरात्री जवळपास २ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले होते. त्यावेळी ड्युटीवर हजर असलेल्या परिचारिकेने दार उघडून बघितले असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या SNIC मध्ये फुटबॉल आणि इन वन अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेले सात बालक वाचविण्यात आले तर औट बॉल युनिटमधील १० मुलांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

भंडारा जिल्ह्यातील सर्व सामान्य रुग्णालय हे गरिब आणि दुर्गम भागातून येणाऱ्या रुग्णांसाठी मोठे आधारवड आहे. त्यामुळे या रुग्णालयात सर्व प्रकारच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.  जन्मल्यानंतर नवजात बालकला काही त्रास उद्भ्वल्यास, वजन कमी असल्यास, बाळाची प्रकृती ठीक नसल्यास त्याला अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये ( SNCU ) ठेवण्यात येत असते. SNCU यूनिट हे पूर्णपणे काचेनं बंद असते, यात तापमान हे बाळाच्या प्रकृतीनुसार नियंत्रित केले जाते. या ठिकाणी डॉक्टर आणि परिचारिकांव्यतिरिक्त कुणालाही आत जाण्यास परवानगी नसते. आधीच प्रकृती नाजूक असल्यामुळे नवजात बाळांची विशेष काळजी घेतली जात आहे.

दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई : अजित पवार

दरम्यान  भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला आग लागून झालेल्या बालकांच्या मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन अजित पवार यांनी दिले. ‘अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटचे तातडीने ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी आपण चर्चा केली असून रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरू ठेवण्याचे तसंच अन्य बालकांवरील उपचार तज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले दु:ख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून भंडाऱ्यातील घटनेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली असून नवजात बाळांनी आपला जीव गमावला आहे. नवजात बाळांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करतो. मला आशा आहे की जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत’ अशी भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली. भाजपचे नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा  यांनी सुद्धा या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेबद्दल शब्दांत दु:ख व्यक्त करणे अशक्य आहे. बाळांच्या कुटुंबीयांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो. या दु:खद संकटाच्या प्रसंगात देव त्यांना शक्ती देवो, अशी भावना अमित शहांनी व्यक्त केली.

दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी  आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि , भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि मन हेलावणारी आहे. ज्या कुटुंबांतील मुलांचा या घटनेत मृत्यू झाला त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना. भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तर भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी , या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी,अशी मागणी केली आहे.

राहुल गांधी यांनीही व्यक्त केले दुःख

या घटनेबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही भंडारा रुग्णालयातील दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.  ‘महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात आग लागल्याची दुर्दैवी घटना अत्यंत वेदनादायी आहे.  जीव गमावलेल्या बाळांच्या कुटुंबीयांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो’ अशी भावना राहुल गांधी यांनी ट्वीट करून व्यक्त केली. तसंच, या दुर्घटनेमध्ये जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करावी, अशी मागणी देखील राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!