MaharashtraNewsUpdate : यंदाचे मराठी साहित्य संमेलन ठरले , अध्यक्षांनी केली घोषणा

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकलाच होणार असल्याची घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी शुक्रवारी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत केली आहे. हे संमेलन २०२०-२१च्या मार्च महिन्याच्या अखेरीस होईल. संमेलनाच्या तारखा निश्चित झाल्यानंतर त्या जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निमित्ताने बोलताना ठाले पाटील म्हणाले कि , साहित्य संमेलनासाठी नाशिकची दोन, सेलूचे एक, पुण्याचं एक आणि अंमळनेरवरुन एक अशी निमंत्रणे आली होती. पुण्याच्या सरहद संस्थेने फेर निमंत्रण पाठवले होते, यामध्ये मे महिन्यांत दिल्लीत संमेलन घेण्याची मागणी केली होती. दरम्यान, संपूर्ण प्रक्रियेनंतर अंतिमतः नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्विकारत ९४व्या साहित्य संमेलनासाठी निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षीचं ९३ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये पार पडलं होतं. गेल्या आठ वर्षांपासून मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखेतर्फे मराठवाड्यात साहित्य संमेलन घेतलं जावं अशी मागणी होत होती. ९३ व्या संमेलनासाठी बुलढाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद अशा चार ठिकाणाहून संमेलनाची मागणी झाली होती. मात्र, यामध्ये उस्मानाबादचे पारडे जड ठरले होते.