Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : प्रवीण राऊत यांची ७२ कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त

Spread the love

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने मोठी कारवाई करताना शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण राऊत यांची ७२ कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईनंतर राऊत यांच्या अडचणींत भर पडण्याची शक्यता आहे. पीएमसी बँकेतील ४ हजार ३०० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी ईडी मार्फत तपास सुरू आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्रवीण राऊत यांना गेल्या फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. पीएमसी बँकेचे ९० कोटी रुपये हडपल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

दरम्यान ईडी पीएमसी बँक घोटाळ्यातील मनी लाँडरिंग प्रकरणात  चौकशी करत आहे. त्यात प्रवीण राऊत व त्यांची पत्नी माधुरी राऊत यांची चौकशी करण्यात आली आहे व त्यांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. दुसरीकडे या प्रकरणात संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. प्रवीण राऊत यांच्या खात्यातून वर्षा राऊत यांच्या खात्यात ५५ लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. यासोबतच तीन कंपन्यांमधील व्यवहारांच्या अनुषंगानेही चौकशी करण्यात येणार आहे, असे ईडीतील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. ईडीने पहिली नोटीस बजावल्यानंतर वर्षा राऊत यांच्याकडून ५ जानेवारीपर्यंत मुदत मागण्यात आली होती. ही मुदत देताना ईडीने आता ५ जानेवारी रोजी हजर राहण्यासाठी वर्षा राऊत यांना समन्स बजावले आहेत.

या सर्व प्रकरणात खा. संजय राऊत यांनी आधीच पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या सगळ्यामागे भाजपचा हात आहे, असा थेट आरोप राऊत यांनी केला आहे. ‘आम्ही मध्यमवर्गीय माणसं आहोत. माझ्या पत्नीने घर खरेदी करण्यासाठी दहा वर्षांपूर्वी एका मित्राकडून कर्ज घेतलं होतं. आयकर विभागाकडे त्याचा तपशील दिलेला आहे. राज्यसभेच्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातही त्याची नोंद केलेली आहे. ईडीला आता दहा वर्षांनंतर त्याची जाग आली आहे’, असे नमूद करत राऊत यांनी निशाणा साधला होता. ‘आमच्यावर जे आरोप करण्यात आले आहेत ते सिद्ध झाले नाहीत तर जे कुणी आता उड्या मारत आहेत त्यांचे थोबाड चपलेने फोडले जाईल…माझे नाव संजय राऊत आहे, याद राखा!’, असा इशाराही राऊत यांनी कुणाचेही नाव न घेता एका मुलाखतीत दिला आहे. त्यामुळेच ईडीच्या ताज्या कारवाईनंतर हे प्रकरण अधिकच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!