Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : कोरोनामुक्त होण्याचा संकल्प , मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्र्यांच्या नव्या वर्षाच्या शुभेच्छा

Spread the love

‘कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करण्याचा आणि त्यासाठी आपल्या वैयक्तिक आरोग्याबरोबरच इतरांच्या आरोग्याची देखील काळजी घेण्याचा संकल्प आपण नव्या वर्षासाठी करूया’, असे आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला नवीन वर्षासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‘गेले वर्षभर संपूर्ण जग करोनाशी लढा देत आहे. महाराष्ट्राने देखील लोकांच्या सहभागाने आणि अतिशय जबाबदारीने ही लढाई लढली आहे. आज आपण विविध मार्गांनी करोना विषाणूचा संसर्ग काहीसा कमी करत आणला असला तरी येणाऱ्या वर्षात बेसावध न राहता आपली व आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे’, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.

करोना संसर्गामुळे एक नवी जीवनपद्धती आपण शिकलो आहोत. यात मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात स्वच्छ ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब आपण करत आहोत. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शिक्षण यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग केला जात आहे. अशावेळी पुढील काळ कसा असेल याचा अंदाज बांधता येणे अवघड आहे. लस आपल्यापर्यंत येईल आणि ती सर्वांना मिळेल हा एक भाग झाला, पण करोना विषाणूच्या बदलत्या रूपामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचाही आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे, असे नमूद करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना सतर्क राहण्याच्याच सूचना केल्या आहेत.

पुनश्च: हरिओम म्हणत आपण सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करीत आहोत. आता आपल्याला मागे परतायचे नाही. तेव्हा करोनापासून स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर नियम आणि कायदे यापेक्षा स्वयंशिस्त पाळणे याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल. विशेषत: नवीन पिढीवर याची जास्त जबाबदारी आहे. नव्या वर्षात आपण जबाबदार नागरिक म्हणून सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेण्याचा निर्धार करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यानी पुढे नमूद केले आहे. आपली आव्हाने कमी होणार नाहीत. शासन यंत्रणा कृतीशील आणि गतिमान आहे. नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटे नेहमीच येतात परंतु, त्याचा सामना सावधपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने करूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीचा अतिशय जिद्दीने सामना करीत असलेल्या डॉक्टर, परिचारिका, पोलीस, शासकीय आणि महापालिका कर्मचाऱ्यांना व स्वयंसेवकांनाही मुख्यमंत्र्यांनी नववर्षाच्या खास शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही शुभेच्छा

कोरोना संकटाच्या सावटाखालीच सर्वांना सरत्या वर्षाला निरोप द्यावा लागत आहे. २०२० मध्ये जी वेदना, कुचंबणा, फरफट वाट्याला आली ती नव्या वर्षात येऊ नये, असे प्रत्येकाला वाटत आहे. नव वर्ष करोनामुक्तीचं असावं, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. त्यावरच बोट ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नववर्षाच्या विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. ‘सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद लवकरच मिळो’, अशी मनोकामना अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

‘मावळतं वर्ष करोना संकटाशी लढण्यात गेलं, येणारं नवीन वर्ष आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य, समाधान घेऊन येवो, नववर्षाच्या सुरुवातीलाच संपूर्ण जग करोनामुक्त होवो, सर्वांना मुक्तसंचाराचा आनंद घेण्याची संधी लवकर मिळो’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला २०२१ या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘मावळत्या २०२० वर्षानं आपल्याला जीवन जगण्यासंदर्भात अनेक नवीन गोष्टी शिकवल्या. त्या गोष्टींपासून बोध घेऊन नववर्षाची सुरुवात करूया. करोनाचं संकट अद्याप कायम असल्यानं मास्क लावणं, गर्दी टाळणं, हात वारंवार धूत रहाणं या त्रिसूत्रीचं पालन करूया. करोनापासून स्वत:चं, कुटुंबाचं, समाजाचं संरक्षण करीत दैनंदिन व्यवहार हळूहळू काळजीपूर्वक सुरू करूया’, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नववर्षानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात केलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!