Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : भारत आणि ब्रिटनमधील प्रवासी विमानसेवा ७ जानेवारीपर्यंत स्थगित

Spread the love

नव्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि ब्रिटनमधील प्रवासी विमानसेवा ७ जानेवारीपर्यंत स्थगित राहणार असून त्यानंतर कडक नियमावलीत ही सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती हवाई वाहतूकमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी बुधवारी दिली. कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्यानंतर नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने युरोपीय देश आणि भारत यामधील विमानसेवा २३ डिसेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात घेतला होता. या स्थगितीला मुदतवाढ देण्याच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या शिफारशीनुसार पुरी यांनी हा निर्णय जाहीर केला.

या आधीच्या निर्णयात बदल करून ‘ब्रिटनमधून होणारी विमान वाहतूक ७ जानेवारी २०२१पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर कडक नियमावलीत सेवा सुरू करण्यात येईल. त्यासाठीचा तपशील लवकरच जाहीर केला जाईल,’ असे ट्विट हरदीपसिंह पुरी यांनी केले आहे. या आधी आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव प्रदीप सिंह खारोला यांना दिलेल्या परिपत्रकात भारत-ब्रिटनमधील विमानसेवेची स्थगिती ७ जानेवारीपर्यंत वाढवण्याची शिफारस करत असल्याचे म्हटले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर लागू करण्यात आलेले निर्बंधांना ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे नागरी हवाई वाहतूक संचालनालयाकडून (डीजीसीए) बुधवारी सांगण्यात आले. वेळोवेळी सक्षम प्राधिकरणाने निवडलेल्या मार्गांवर आंतरराष्ट्रीय नियोजित विमानसेवेस परवानगी दिली जाऊ शकते, असेही डीजीसीएकडून स्पष्ट करण्यात आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!