सीबीएसई बोर्डाच्या, दहावी – बारावी परीक्षा 4 मे पासून

सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दहावीची आणि बारावीची परीक्षा 4 मे ते 15 जुलै या दरम्यान होईल अशी घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी केली. कोरोनामुळे यंदाचे शैक्षणिक वर्षं लांबले. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षाही उशीरा घेण्यात येत आहेत. दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे निकाल 15 जुलैच्या आत लागतील, अशीही घोषणा रमेश पोखरियाल निशांक यांनी केली आहे.
We have decided to conduct Class 10th & Class 12th CBSE board exams from May 4. The exams will conclude by June 10, 2021. Results will be out by July 15: Union Education Minister Ramesh Pokhariyal pic.twitter.com/UcRMBhqgRj
— ANI (@ANI) December 31, 2020
या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक शहरांमध्ये अजूनही शाळा सुरू होऊ शकलेल्या नाही. देशात अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. दहावी-बारावीच्या परीक्षादेखील उशीरा होणार, असे गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आले होते. गेल्याच आठवड्यात पोखरियाल यांनी ट्वीट करून आपण 31 डिसेंबरला सीबीएसई बोर्ड परीक्षा 2021ची घोषणा करू, असे सांगितले होते. या वर्षी परीक्षा फेब्रुवारीनंतरच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, परीक्षा नेहमीप्रमाणे पेन आणि पेपरवर होईल. ऑनलाईन स्वरूपाची नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशात अनेक भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्यातच नव्या कोरोनाच्या अवताराने जगभरात पुन्हा खळबळ उडवली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने दहावी-बारावीच्या परीक्षा मेमध्ये घेण्याची मागणी केली होती. या वर्षीच्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमही कमी केलेला असेल. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, त्यांच्या पुढच्या शिक्षणात अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी अभ्यासक्रम वगळताना काळजी घेण्यात आली. शैक्षणिक वर्ष कोरोनामुळे उशीरा सुरू झाले. त्यामुळे नेहमीचा अभ्यासक्रम पूर्ण होणे अशक्य आहे. शिवाय ऑनलाइन वर्ग सुरू असल्याने विद्यार्थ्यांना अवघड संकल्पना समजण्यासही अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत सीबीएसई ने अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला होता. एकूण सिलॅबसच्या 30 टक्के वजा करून बहुतेक राज्य बोर्डाची परीक्षा घेणार आहेत. प्रत्यक्ष परीक्षेतही मुलांना 33टक्के अंतर्गत पर्यायांचे प्रश्न विचारण्यात येतील. मुलांचे आकलन तपासले जाईल, असे पोखरियाल यांनी सांगितले होते.