Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : टीआरपी घोटाळा प्रकरण : पार्थोच्या पोलीस कोठडीत वाढ , अर्णब गोस्वामीवर पुन्हा एकदा अटकेची टांगती तलवार

Spread the love

बहुचर्चित टीआरपी घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल ( BARC ) चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान पार्थच्या चौकशीत धक्कादायक माहिती पुढे आली असून  टीआरपी मध्ये फेरफार करण्यासाठी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी पार्थो दासगुप्ता यांना वेळोवेळी लाखो रुपये दिले आहेत, असे या प्रकरणी तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांच्या क्राइम इंटिलिजन्स युनिटने आज किला न्यायालयात  सांगितले. त्यामुळे अर्णब गोस्वामीला पुन्हा एकदा अटक करण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरु केले असल्याचे वृत्त आहे.


टीआरपी घोटाळ्यात पार्थो दासगुप्ता यांच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज किला कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोठडी वाढवून मिळण्यासाठी पोलिसांनी केलेल्या अर्जात टीआरपी घोटाळ्याला नवी कलाटणी देणारी माहिती पुढे आली आहे. पार्थो दासगुप्ता यांनी रिपब्लिक भारत आणि रिपब्लिक टीव्हीच्या इंग्रजी चॅनेलच्या टीआरपीत फेरफार करण्यासाठी अर्णब गोस्वामी व अन्य संबंधितांशी संगनमत करून बेकायदा काम केले, असे पोलिसांच्या अर्जात नमूद करण्यात आले आहे. टीआरपीत फेरफार करण्याच्या बदल्यात अर्णब गोस्वामी यांनी पार्थो यांना वेळोवेळी लाखो रुपये दिले आहेत. या पैशांतून पार्थो यांनी मौल्यवान वस्तू, महागडे दागिने खरेदी केले आहेत. पार्थो यांच्या घराची झडती घेतली असता घरातून एक लाख रुपये किमतीचं हातातलं घड्याळ, चांदीसारख्या धातूपासून बनवलेले ३०० ग्रॅम वजनाचे दागिने सापडले आहेत, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयापुढे ठेवली.

दरम्यान अर्णब यांच्या पैशांतून पार्थो यांनी आणखीही आर्थिक व्यवहार केले असण्याची शक्यता असून त्याची चौकशी करण्यासाठी पार्थो यांच्या कोठडीत वाढ करावी, अशी विनंती पोलिसांनी केली. त्यावर पार्थो यांना न्यायालयाने ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पार्थो यांचे दोन मोबाईल फोन, एक लॅपटॉप आणि आयपॅडही पोलिसांनी जप्त केला असून त्यातूनही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.  टीआरपी घोटाळा प्रकरणी ६ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासूनच रिपब्लिक टीव्ही व अन्य काही चॅनेल संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. असे असले तरी मुंबई पोलिसांनी आज प्रथमच अर्णब गोस्वामी यांचा उल्लेख कोठडीसाठी केलेल्या अर्जातून केला असून अर्णब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!