AurangabadNewsUpdate : कुख्यात गुन्हेगारांकडून कारसह दोन तलवारी जप्त , शहरात नाकाबंदी करून संशयीत वाहनधारकांची चौकशी

औरंंंगाबाद : रेकॉर्डवरील दोन कुख्यात गुन्हेगारांकडून पोलिसांनी एका कारसह दोन धारदार तलवारी हस्तगत केल्या आहेत. ही कारवाई शनिवारी (दि.२६) दुपारी करण्यात आली असल्याची माहिती छावणी पोलिस ठाण्याच्या सुत्रांनी दिली. मोहम्मद मुस्तफा मोहम्मद मस्तान (वय २८, रा. जहांगिर कॉलनी) आणि शेख उरुज शेख अजीज (वय १८, रा. रशीदपुरा) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींची नावे आहेत.
वाहतुक शाखेचे उपनिरीक्षक गोकुळ ठाकुर, संजय बनसोड, ताहेर पटेल, सहायक फौजदार मिलींद पठारे, चालक अनिस शेख हे नाकाबंदीदरम्यान एएस क्लबकडून येणा-या वाहनांची तपासणी करत होते. दुपारी बाराच्या सुमारास एक कार क्रमांक (एमएच-०४-बीक्यू-४३२९) भरघाव जाताना दिसली. त्यामुळे पोलिसांनी कार चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र, कार चालक थांबत नसल्याचे पाहून पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पाठलाग सुरू केला.
काही अंतरावर या भरधाव कार चालकला थांबवून त्याला खाली उतरवून डिक्कीची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्याच्या डिक्कीत दोन तलवारी पोलिसांना आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत छावणी पोलीस ठाण्यात नेले. यानंतर वाहतूक शाखेचे शिपाई अब्दुल वडजकर यांच्या तक्रारीवरुन अट्टल गुन्हेगार मोहम्मद मुस्तफा व शेख उरुज यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक पांडुरंग भागीले करत आहेत.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-यावर कारवाई
औरंंंगाबाद : वाढत्या वाहन चो-या आणि मंगळसूत्र चो-या रोखण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांच्या आदेशाने शहराच्या विविध भागात पोलिसांनी नाकाबंदी करून संशयीत वाहनधारकांची शनिवारी (दि.२६) चौकशी केली. पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनधारकांत खळबळ उडाली होती.
गेल्या काही दिवसापासून औरंगाबाद शहर परिसरात वाहन चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. वाढत्या वाहन चोरीच्या घटना रोखण्यासाठी तसेच नवीन वर्षाचे स्वागत करतांना शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी शहरातील सर्व पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना दिले आहेत. पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार शनिवारी दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत शहराच्या विविध भागात पोलिसांनी नाकाबंदी करून संशयीत वाहनधारकांची चौकशी केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून दंड वसूल केला. पोलिसांच्या नाकाबंदी मोहिमेत होमगार्डच्या जवानांनी देखील सहभाग घेतला होता.
फॅन्सी सायलेंन्सर असणा-या बुलेटवरही कारवाई
पोलिसांनी बुलेटचे सायलेंन्सर बदलून फॅन्सी सायलेंन्सर लावून मिरवणा-यावर देखील कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या काही दिवसापासून शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी पोलिस आयुक्तालयासमोर बुलेट धारकांना थांबवून सायलेंन्सरची तपासणी करीत आहेत.