MaharashtraNewsUpdate : ‘सावित्रीजोती’ मालिकेला अर्थसहाय्य करण्याची भुजबळ, राऊत यांची मागणी

महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत सोनी मराठी वाहिनीवर सुरु असलेली ‘सावित्रीजोती’ मालिका बंद करण्यात येत असून महापुरुषांचा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने या मालिकेसाठी अर्थसहाय्य देण्यात यावे अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.
दरम्यान राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनीही सोनी मराठी वाहिनीवरील ‘सावित्रीजोती’ ही सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या जीवनावरील मालिका बंद करू नये तसेच या मालिकेच्या निर्मितीसाठी चित्रपटाप्रमाणे अनुदान देण्याबाबत विचार करण्याची विनंती सांस्कृतिक मंत्री अमित देशमूख यांना एका पत्राद्वारे केली आहे.
यासंदर्भातभुजबळ यांनी म्हटले आहे कि , महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित दशमी निर्मिती संस्था यांची निर्मिती असलेली ‘सावित्रीजोती’ ही मालिका सोनी मराठी या वाहिनीवर प्रदर्शित होत आहे. महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे संपूर्ण जीवन व समाजकार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत या मालिकेद्वारे पोहचविले जात आहे. मालिकेचे अद्याप १०० भाग प्रदर्शित होण्याचे बाकी आहेत, असेही भुजबळ यांनी सांगितले.
महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक सुधारणेच्या कालखंडाबाबतचे भाग प्रदर्शित होणे बाकी आहे. या महापुरुषांच्या जीवनावरील माहितीपूर्ण भाग प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या मालिकेसाठी राज्य शासनामार्फत अर्थसहाय्य देण्यात यावे अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.