Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात पोलीस कोठडी

Spread the love

कन्नडचे  माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हर्षवर्धन जाधव यांना अटक केल्यानंतर आज शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने त्यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान हर्षवर्धन जाधव यांनी न्यायालयात फिर्यादीनंच आपल्याला मारहाण केली असल्याचा दावा केला. तसंच आपल्यावर दाखल झालेला गुन्हा आणि अटक राजकीय असल्याचाही आरोप केला. अमन अजय चड्डा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हर्षवर्धन जाधव आणि इषा झा या दोघांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला.

न्यायालयासमोर बाजू मांडताना हर्षवर्धन जाधव  म्हणाले की, “आपल्यावर दाखल झालेला गुन्हा आणि अटक राजकीय हेतूने आहे. माझी सहकारी इशा झा हिच्यासोबत पुण्यातील बावधन भागातील एका दुकानात गेलो होतो, तेव्हा फिर्यादीने दोघांचे अपहरण आणि मारहाण केली”. हर्षवर्धन जाधव यांनी यावेळी पोलीस आपली तक्रारच घेत नव्हते असा आरोपही केला. याशिवाय मारहाणीची घटना सोमवारी घडलेली असताना मंगळवारी संध्याकाळी गुन्हा दाखल झाला असं सांगत यामागे राजकीय हात असल्याचा दावा त्यांनी केला. जाधव यांना अटक केल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांचा एक व्हिडीओसमोर आला आहे. टी-शर्ट फाटलेल्या आणि दयनीय अशा अवस्थेतला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वकिलांचे म्हणणे

दरम्यान हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत असणाऱ्या महिला सहकाऱ्यांचा विनयभंग करण्यात आल्याचं त्यांचे वकील झहीर खान पठाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. “औंधला जात असताना कारसमोर दुचाकी लावून अडवण्यात आलं. यानंतर हर्षवर्धन आणि त्यांच्या महिला सहकाऱ्या कारमध्ये बसवण्यात आलं. फिर्यादी अमन चड्डा, त्याचा भाऊ तुषार चढ्ढा आणि नगरसेवक मनिष आनंद यांनी दोघांना बेदम मारहाण केली. महिलेचा विनयभंगही केला. हा प्रकार निर्भया प्रकरणापेक्षा कमी नाही”. “औरंगाबादमधील कौटुंबिक न्यायालयात हर्षवर्धन जाधव आणि त्यांच्या पत्नीतील वाद सुरु आहे. माझ्या जीवाला काही झाल्यास दानवे जबाबदार असतील असं त्यांना स्पष्ट सांगितलं होतं. दोन प्रकरणात आमच्या बाजूने निकाल लागला. असं काही तरी होईल याची आम्हाला कल्पना होती,” असंही यावेळी झहीर खान पठाण म्हणाले आहेत.

असे आहे प्रकरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अमन चड्डा सोमवारी सकाळच्या सुमारास आई, वडिलांना दुचाकीवरून ब्रेमन चौकाकडे घेऊन जात होते. याचवेळी हर्षवर्धन जाधव आणि इशा झा हे रस्त्याच्या बाजूला एका चारचाकीमध्ये बसले होते. कारचा दरवाजा उघडल्याने चड्डा यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यानंतर चड्डा यांनी चार चाकीमध्ये बसलेल्या हर्षवर्धन जाधव आणि ईशा यांना जाब विचारला. त्यावर हर्षवर्धन जाधव आणि इशा झा यांनी अमन चड्डा आणि त्यांच्या वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी चड्डा यांनी वडिलांच्या हृदयाचे ऑपरेशन झाल्याचं सांगितलं. मात्र तरीही दोघांनी मारहाण करणं चालूच ठेवलं. यानंतर अमन चड्डा यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार हर्षवर्धन जाधव यांना बुधवारी अटक करुन सकाळी शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!