Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : स्तंभ लेख : महानायक विशेष : प्राचार्य ल. बा. रायमानेसर : मिलिंदचे नागसेन गेले !

Spread the love

भारतरत्न डाॅ . बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि दलित साहित्याच्या संवर्धनात 60 च्या दशकात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रा. ल.बा. रायमाने यांचे आज औरंगाबादेत अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या स्मृत्यर्थ ज्येष्ठ पत्रकार अरविंद भराडे यांचा हा स्तंभ लेख.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्याची बातमी देशभर पसरली. कोल्हापूरच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या वीस-बावीस वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या कानावरही ही बातमी आली. काही झाले तरी बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेत सहभागी व्हायचे या एका ध्येयाने त्याला झपाटलं. मुंबईला जायचे तर खरे पण खिशात पैसे नाहीत. सुरवातीला तो आपल्या एका मित्राला घेऊन कॉलेजच्या प्रिन्सिपलकडे गेला. पण त्यांची भेट झाली नाही. मग महाविद्यालयाच्या लायब्ररीयनने त्यांना मुंबईला जाण्यासाठी पैसे दिले.

बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी धडपडणारा विद्यार्थी

बाबासाहेबांचे अंतिम दर्शन झाले, या भावनेने तो तृप्त झाला. बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी धडपडणारा तो विद्यार्थी म्हणजे मिलिंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ल. बा. रायमाने हे होते. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : एक दर्शन’ या लेखात स्वतः त्यांनीच ही आठवण सांगितली. मात्र विचित्र योगायोग बघा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अवघे जग अभिवादन करत असताना नेमकी आजच्याच (6 डिसेंबर, 2020) दिवशी ल. बा. रायमाने यांची प्राणज्योत मालवली ! वयाच्या 85 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

कर्नाटक- महाराष्ट्र सीमेवरील कृष्णाकाठच्या तीरावरील अंकली हे त्यांचे जन्मगाव. 24 जानेवारी 1936 रोजी त्यांचा जन्म झाला. महात्मा बसवेश्वर, ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी यांच्या विचार संस्कारांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व घडलेले होते. रायमाने सर 1963 साली मिलिंद महाविद्यालयात रुजू झाले. तो काळ म्हणजे आंबेडकरी चळवळीचा सुवर्णकाळ. मिलिंदच्या कॅम्पसमध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमांची नुसती रेलचेल होती. डॉ. म. भी. चिटणीस, डॉ. म. ना. वानखेडे यांच्यासारख्या दिग्गज प्राचार्यांचा सहवास त्यांना लाभला. मिलिंद जर्नल, मिलिंद साहित्य परिषद, अस्मिता त्रैमासिक यासारखे उपक्रम सुरू होते. त्यातून दलित साहित्याच्या निर्मितीला पूरक वातावरण निर्मिती करण्यात रायमाने यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी काशीनाथ पोतदार यांनी लिहिलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र ग्रंथाचा कानडी भाषेत अनुवाद केला.

मिलिंद महाविद्यालयाचा प्राध्यापक हा नागसेनासारखा विद्वान असला पाहिजे, अशी बाबासाहेबांची अपेक्षा होती. त्या कसोटीला रायमाने सर पुरेपूर उतरले होते. यशवंत मनोहर, योगीराज वाघमारे, प्र. ई. सोनकांबळे,, राम दुतोंडे, कमलाकर कांबळे, अरुणा लोखंडे, शांताराम हिवराळे, ना. तु. पोघे, महेंद्र भवरे यांच्यासारखे अनेक दिग्गज विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये रायमाने यांचा मोलाचा वाटा आहे. जातीअंताचा विचार प्रत्यक्ष कृतीतून उतरविणारे ल. बा. रायमाने यांना विनम्र अभिवादन.

  • अरविंद भराडे

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!