Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : चर्चेतली बातमी : योगी काय म्हणून आले आहेत मुंबई दौऱ्यावर ?

Spread the love

खरे तर कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विदेशी गुंतवणूक आणि उद्योजक आपल्या राज्यात यावेत म्हणून विदेशात प्रयत्न करणे गरजेचे असते परंतु  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशातील गुंतवणुकीचा संकल्प घेऊन दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी रात्री त्यांचे मुंबईत आगमन झाले. त्यांचा मुक्काम ट्रायडेंट हॉटेलमध्ये असून तिथे अभिनेता अक्षयकुमारने त्यांची भेट घेतली आहे. या दौऱ्यात योगी हे फिल्मसिटीशी संबंधित गुंतवणूकदार व देशातील आघाडीचे उद्योजक तसेच उद्योगसमूहांशीही गुंतवणुकीवर चर्चा करणार आहेत.

दरम्यान महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य आहे. उद्योजकांना आजही महाराष्ट्राचे आकर्षण कायम आहे, असे सांगतानाच राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत तर इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात उद्योगासाठी येतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी टोला हणाला आहे.

आपला मुंबई दौरा आणि अभिनेता अक्षय कुमारची भेट याबाबत स्वतः योगी आदित्यनाथ यांनीच ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरात यमुना एक्स्प्रेस-वे जवळ चित्रनगरी ( फिल्मसिटी ) उभारण्यात येत आहे. याबाबत योगी यांनी अक्षयकुमारसोबत चर्चा केली. त्यांनी म्हटले आहे कि ,   ‘भारतीय सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेते अक्षयकुमार यांच्यासोबत औपचारिक भेट झाली. सिनेविश्वाच्या विविध पैलूंवर त्यांच्यासोबत विस्तृत चर्चा झाली’, असे योगींनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले आहे. सिनेविश्वातील एक कलावंत म्हणून अक्षयकुमार यांची सचोटी, समर्पण आणि सकारात्मकता निश्चितच युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत योगींनी अक्षयकुमारचे कौतुकही या ट्वीटमध्ये केले आहे.

योगीचा  असा आहे कार्यक्रम

दरम्यान, लखनऊ नगरपालिका बॉण्ड मुंबई शेअर बाजारात एंट्री घेत असून त्याचा लिस्टिंग सोहळा आज सकाळी ९ वाजता मुंबई शेअर बाजार येथे योगींच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता ते डीफेन्स कॉरिडोरच्या गुंतवणूकदारांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर फिल्मसिटीशी संबंधित गुंतवणूकदार व देशातील आघाडीचे उद्योजक आणि उद्योगसमूहांशीही ते उत्तर प्रदेशातील गुंतवणुकीवर चर्चा करणार आहेत. त्यानंतर पत्रकार परिषदेत मुंबई दौऱ्याबाबत ते माहिती देणार आहेत. आज संध्याकाळीच योगी आदित्यनाथ पुन्हा लखनऊला परतणार आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याबद्दल टीका करताना गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी म्हटले आहे कि ,, मुंबईतील सिनेसृष्टी उत्तर प्रदेशात नेण्याचा भाजपचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. सिनेसृष्टी ही महाराष्ट्राची आणि मुंबईची शान आहे. येथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सिनेसृष्टी इतर राज्यात जाऊ देणार नाही, असे पाटील यांनी सांगितले. दरम्यान या हॉट टॉपिकवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना ,  सिनेसृष्टीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा मुंबईत आहेत. देशात कुठेही नाहीत एवढ्या सुविधा येथे आहेत. त्यामुळे ती इतरत्र हलविण्याचा प्रश्नच येत नाही. मुख्यमंत्री आदित्यनाथ हे कदाचित या सिनेसृष्टीच्या अभ्यासासाठी मुंबईत येत असावेत, असे सांगत योगींवरील आरोप फेटाळले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!