Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathwadaElectionSpecial : वसंत भालेराव : ना महागडा भपकेबाज प्रचार , ना पक्षाचे पाठबळ , ना कार्यकर्त्यांचा लवाजमा , ना गाड्यांचा थाट !! असा हा उमेदवार ….

Spread the love

कीर्ती गाडे । औरंगाबाद


औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी उद्या १ डिसेंबर रोजी मतदान होत आहे . एकूण ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. मात्र चर्चा आहे ती फक्त दोन उमेदवारांच्या लढतीची. या ३५ उमेदवारांपैकी आणखी दोन – चार उमेदवार सोडले तर माध्यमे अन्य उमेदवारांची चर्चाही करीत नाहीत . माध्यमांचा हा पक्षपातीपणा बरोबर नाही. जे उमेदवार माध्यमांना जाहिराती देतील , माध्यमांच्या मालकांना, पत्रकारांना  खुश करतील त्यांनाच हि माध्यमे स्पेस देतात खरे तर इतर उमेदवार का उभे आहेत ? याचीही विचारणा माध्यमांनी  करायला हवी पण असे होत नाही याची खंत वाटते. हे उद्गार आहेत या निवडणुकीत अपक्ष लढणारे तरुण उमेदवार वसंत भालेराव यांची.

वसंत भालेराव यांनी प्रचारानंतर थोडासा वेळ मिळाल्याने “महानायक ऑनलाईन”ला भेट देत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. ना महागडा भपकेबाज प्रचार , ना पक्षाचे पाठबळ , ना कार्यकर्त्यांचा लवाजमा ना गाड्यांचा थाट . असा हा उमेदवार . अशा परिस्थितीत तुम्ही हि  निवडणूक का लढवताय ? असा प्रश्न विचारला असता वसंत भालेराव म्हणाले कि , हवंय कशाला हे सगळं . २० -२५ हजारातही हि निवडणूक लढवता येते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. समाजातील तरुण पदवीधरांची अवस्था बघवत नाही . त्यांचा वापर फक्त मतांसाठी केला जातो .  पदवी , पदव्युत्तर शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी सोडा , नीट जगण्याचीही हमी नाही. गेल्या १०- १२ वर्षांपासून कोणतीही भरती नाही . एखादा उद्योग करावे म्हटले तर केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना असूनही बँक उभे करीत नाही. बरे उभे केलेच तर हातात जी चेक लिस्ट देतात ती पाहूनच तरुणांचा जीव जातो. खासगी नोकऱ्या किती दिवस टिकतील याची खात्री नाही . अशा एक नव्हे तर अनेक प्रश्नांवर भालेराव बोलत होते.

प्रचार कसा केला ?

याचे उत्तर देताना भालेराव म्हणाले कि , माझा मित्र परिवार पूर्ण मराठवाड्यात आहे . मोटारसायकलमध्ये स्वतःचे पेट्रोल भरून त्यांनी प्रचार केला. तर माझ्या सोबतच्या कार्यकर्त्यांनी वडा -पाव, भाजी आणि  चहा पाण्यावर माझ्यासोबत फिरून प्रचार केला . ज्यांना मतदारांना कामापुरते वापरून लुटायचे आहे ते लाखो रुपये खर्च करतात हे आता पदवीधरांना कळून चुकले आहे. म्हणून ते माझ्यासारख्या प्रामाणिक उमेदवाराला मतदान करतील असा मला विश्वास आहे. कोरोनामुळे सध्या बस -रेल्वेच्या प्रवासावर बंधने असली तरी या प्रवासी साधनांचा वापर करूनही प्रचार करता येतो हे मी अनुभवाने सांगतो. तरुणांनींही भपकेबाज प्रचाराला  पुन्हा पुन्हा बळी पडून बळीचा बकरा बनू नये असे मला वाटते. मला संपूर्ण मराठवाड्यामधून चांगला प्रतिसाद आहे.

तुमची तरुणांच्या विकासाची योजना काय ?

यावर भालेराव म्हणाले , मराठवाड्यातील तरुण अत्यंत होतकरू आणि कष्टाळू आहे . त्यांच्या हातांना काम देण्याची गरज आहे. मराठवाड्यात ४-४ मुख्यमंत्री झाले . उपमुख्यमंत्री झाले, अनेक जण मंत्री झाले पण मराठवाड्याचा मागासलेपणाचा शिक्का पुसू शकले नाही. मराठवाड्यात हे नेते पुण्या -मुंबईसारखे उद्योग आणू शकले नाही . असे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे . पण ज्यांना मराठवाड्यातील तरुणांनी आपले प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली त्यांनी काहीच केले नाही. अमुक एक आपले आमदार आहेत याचीही तरुणांना माहिती नाही हे  दुर्दैव आहे. मराठवाड्यात आय .टी . हब व्हावे , त्यांना  स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. खासगी शिक्षण संस्थांकडून तरुण उमेदवारांची नोकरीच्या नावाखाली पिळवणूक केली जात आहे . ती थांबविण्याची गरज आहे.

काम करण्याची इच्छाशक्ती हवी

मराठवाड्यात अनेक प्रतिभावंत आहेत त्यांच्यासाठी संधी निर्माण करता येतील. म्हणजे त्यांना पुणे -मुंबईला जाण्याची गरज पडणार नाही. अशा अनेक योजना आहेत. करता येण्यासारखे खूप आहे पण ते करण्याची इच्छा शक्ती हवी आणि ती माझ्यामध्ये आहे. ” बोले तैसा चाले …” या न्यायाने काम करणे मला आवडते म्हणून मी उभा आहे. मला सर्वसामान्य शाखेतील पदवीधरांबरोबर  पत्रकार , वकील , डॉक्टर , इंजिनिअर यांच्यासाठीही काम करायचे आहे .  हजारो रुपये खर्च करून व्यावसायिक शिक्षण घेऊनही या सर्वांच्याच जीवनात अस्थिरता आहे आणि सरकार या पदवीधरांकडे सहानुभूतीने पाहताना दिसत नाही. यांच्याबद्दलही काम करण्याची गरज आहे.  त्यांच्या विजयासाठी राजू पडवळ,  प्रसिद्ध गायक राजेश तुपे,  किरण कुमार जाधव,  सुभाष निर्मळ,  बाबुराव हिवराळे, आवेश  कुरेशी,  अशोक बनकर, महेंद्र दाभाडे , महेंद्र गायकवाड , येळंबकर,  अतुल बत्तीसे आदी परिश्रम घेत आहेत.

जाता जाता ….

बऱ्याचदा अपक्ष उमेद्वारांबद्दल लोक फारशी चांगली चर्चा करीत नाहीत. असे उमेदवार तोडी -पाणी करण्यासाठी उभे राहतात, काही उमेदवार उभे केले जातात अशीही चर्चा केली जाते पण या उमेदवाराला पाहून असे वाटले कि , असे असतेच असे नाही. स्वतःच्या खर्चाने सामाजिक कार्याच्या वेडापायी अनेक जण उभे राहतात पण त्यांच्या भावनेचा मतदार विचार करीत नाहीत हे खरे आहे .  वसंत भालेराव यांनी परखडपणे आपली मते महानायकशी बोलताना मांडली . अत्यंत खर्चिक झालेल्या निवडणुकीच्या गदारोळात वसंत भालेराव यांच्यासारखे उमेदवार निवडणूक निकालात कुठे असतील ? हे सांगतां येणार नाही पण असे जिगरबाज आणि आपल्या कल्पनेप्रमाणे काही तरी नवीन घडावे या जिद्दीने निवडणुकीत उभे राहतात हे या निमित्ताने महत्वाचे आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!