Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathawadaNewsUpdate : महाविकास आघाडीचे सरकार पुढील २५ वर्षे टिकेल , सतीश चव्हाण यांच्या प्रचार प्रसंगी नवाब मलिक

Spread the love

औरंगाबाद : महाविकास आघाडी महिन्या एक-दोन महिन्यात पडणार असे भाकीत करण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांना छंद लागला आहे. मात्र हे सरकार केवळ पाच वर्षच नव्हे तर २५ वर्षांपर्यंत टिकेल असा विश्वास कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी करत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण हे गेली दोन टर्मपासून यशस्वी जनसेवा करत असून यंदाही त्यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. नवखंडा महाविद्यालयात महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ शनिवारी  आयोजित सहविचार सभेत ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर फौजिया खान, बाळासाहेब थोरात, युसूफ उस्मानी, शेख मन्सूर मुस्तफा, छाया जंगले, आ. राजेश राठोड, डॉ. मकदूम फारुखी, मिर्जा सलीम बेग, एस. पी. जवळकर, सुरजितसिंग खुंगर, कैलास पाटील, शिवाजी पाटील बनकर, जकीयोद्दीन सिद्दीकी आदींची उपस्थिती होती.

सतीश चव्हाण यांना विजयाची खात्री

पुढे बोलतांना मंत्री मलिक म्हणाले की, पदवीधर मतदान प्रक्रिया इतर निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. यात निवडणूक आयोगाने पुरविलेल्या पेननेच पसंतीचे क्रमांक नमूद करायचे आहे. मतपत्रिका फोल्ड करताना उभी फोल्ड करावी अन्यथा तुमचे मत अवैध ठरू शकते असे मलिक यांनी सांगितले. यावेळी आ. विक्रम काळे यांनीही उमेदवार सतीश चव्हाण यांना निवडून देण्याचे आवाहन केले. तर सतीश चव्हाण यांनी संगितले कि, येथील उमेदवार चाणाक्ष आहे. तो पार्टी किंवा चेहरा बघून मतदान करत नाही. ८० टक्के मतदार हे उमेदवाराचे काम बघून मत टाकतात. गेल्या १२ वर्षात आपण अनेक चांगली कामे केली आहेत. याची माहिती घेत मतदार आपल्याला मत देणार असल्याची खात्री त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आपले मनोगत व्यक्त करताना महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण म्हणाले की, राजकारणाच्या बाहेर जाऊन चांगल्या दर्जाचे शिक्षण देणारी मराठवाड्यात नावाजलेली औरंगाबाद शहर उर्दू माध्यम शैक्षणिक संस्था म्हणजेच नवखंडा महाविद्यालय आणि त्या संबंधीची संस्था आहे. सर्वच प्रश्न सुटले असा दावा मी करत नसल्याचे सांगत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण म्हणाले की, आगामी काळात पदविधरांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी मला पुन्हा एकदा विधपरिषदेत मराठवाडा मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी द्यावी अशी विनंती सतीश चव्हाण यांनी बोलतांना केली.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व मित्र पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांनी मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यात प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादावरून शनिवारीही (दि.२८) प्रचाराचा झंझावात दिसून आला. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार केला.  चव्हाण यांनी औरंगाबाद शहरातील विविध शाळा, महाविद्यालय, आयएचएम हाऊस, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, पदवीधरांच्या भेटी घेतल्या. चव्हाण यांनी विविध ठिकाणी सहविचार सभा, तसेच मेळाव्यावर जोर दिल्याचे चित्र दिसून आले.

युवा सेनेचा विजय संकल्प मेळावा

युवा सेनेचे महाविद्यालय कक्ष प्रमुख ऋषीकेश जैस्वाल यांच्या संयोजनात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात युवा सेनेचा विजय संकल्प मेळावा घेण्यात आला. यावेळी आमदार प्रदीप जैस्वाल म्हणाले की, बारा वर्षात मराठवड्याचे प्रश्न आक्रमकपणे सतीश चव्हाण यांनी विधीमंडळात मांडले. याचे कौतुक मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनीही केले आहे. सतीश चव्हाण हे यंदा ह्याट्रिक साधणारच असा विश्वास व्यक्त करत येत्या १ डिसेंबर रोजी विक्रमी मतदान करून सतीश चव्हाण यांना विजयी करावे असे आवाहन आमदार प्रदीप जैस्वाल यांनी केले. यावेळी युवती प्रमुख डॉ. अश्विनी जैस्वाल, मध्यवर्ती बँकेचे संचालक अभिजीत देशमुख यांची उपस्थिती होती. ऋषिकेश जैस्वाल यांनी कमी वयात चांगले सामाजिक कार्य सुरू केल्याने आता त्यांना जरा मोकळीक द्या अशी कोपरखळी महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना काढली. यावेळी प्रचंड संख्येने युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडू ओक यांनी केले.

विद्यापीठ गेटवर युवा संवाद मेळावा

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, युवा सेना, तसेच विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने भव्य युवासंवाद मेळावा शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी सर्व युवकांनी जोमाने कामाला लागावे असे सांगत पदवीधर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यानांच प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. यावेळी माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, इब्राहिम पठाण, जगन्नाथ काळे, पी.वाय. कुलकर्णी, काँग्रेस चे शहराध्यक्ष हिषाम उस्मानी, जितेंद्र देहाडे, शिवसेनेचे विजय सुबुकुडे, राष्ट्रवादी चे अमोल दांडगे यांची उपस्थिती होती. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी येतात. या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी, तसेच त्यांचा अडचणी दूर व्हाव्यात यासाठी माझा  प्रयत्न असेल अशी ग्वाही उमेदवार सतीश चव्हाण यांनी बोलताना दिली.

सहविचार सभा, मेळाव्यावर जोर

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व मित्र पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांनी आपल्या प्रचारार्थ औरंगाबाद शहरातील महाराष्ट्र राज्य परीट धोबी युवक मंडळ विभागाच्या वतीने गणेश मर्ढेकर यांच्या संयोजनात उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ सहविचार सभा घेण्यात आली. शहागंज येथील गांधी भवनात शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांच्या संयोजनात काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संवाद मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात माजी मंत्री अनिल पटेल, श्रीमती लेने, प्रकाश मुगदीया, आदींची उपस्थिती होती.राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व मित्र पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांनी आपल्या प्रचारार्थ औरंगाबाद शहरातील विविध संस्था, संघटना, यासह शाळा महाविद्यालयातील शिक्षक, पदवीधरांशी महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी संवाद साधला. प्रचाराला केवळ दोन दिवस बाकी असल्याने चव्हाण यांनी पदविधरांच्या बैठकांचा धडाका लावला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!