MaharashtraNewsUpdate : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास छगन भुजबळ यांचा विरोध

Spread the love

राज्यातील  सरकार फडणवीस यांचे असो किंवा महाआघाडीचे, मराठा आरक्षणाला आम्ही कधीच विरोध केला नाही. मात्र, ‘आम्हाला इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण द्यावे’, अशी मागणी मराठा समाजातील काही नेते करीत आहेत. आपल्या आरक्षणावर गदा येत असेल, तर आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी लढावेच लागेल, असा इशारा अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापकअध्यक्ष छगन भुजबळ यांनी शनिवारी दिला. महात्मा फुले यांनी आपल्याला लढायला शिकवले, असेही भुजबळ म्हणाले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त भुजबळ यांच्या हस्ते डॉ. तात्याराव लहाने यांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नलावडे, प्रा. हरी नरके, राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकर, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू एकनाथ खेडेकर, माजी आमदार जयदेव गायकवाड, कमल ढोले-पाटील, आरती कोंढरे, मनीषा लडकत, योगेश ससाणे, गौतम बेंगाळे, रवी चौधरी या वेळी उपस्थित होते.

भारतरत्न मिळाले नाही म्हणून महात्मा फुले यांचे मोठेपण कमी होत नाही

यावेळी बोलताना  भुजबळ पुढे  म्हणाले, ओबीसी समाजाच्या अनेक मागण्यांसाठी शासनाशी संघर्ष करावा लागत आहे. ‘बार्टी’, ‘सारथी’ प्रमाणेच ‘महाज्योती’ संस्थेसाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी. ओबीसी समाजासाठी सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविण्यात यावी. प्रत्येक जिल्ह्य़ात ओबीसी समाजातील मुलांसाठी वसतिगृहाची उभारणी करावी. नोकऱ्यांमधील अनुशेष दूर करून ओबीसींच्या आर्थिक मदतीसाठी आधार योजना सुरू करण्यात यावी. मंत्रालयातील झारीतले शुक्राचार्य ओबीसी आरक्षणामध्ये अडचणी आणत आहेत. भारतरत्न मिळाले नाही म्हणून महात्मा फुले यांचे मोठेपण कमी होत नाही, असा टोला भुजबळ यांनी लगावला.

डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचे कौतुक

सत्काराला उत्तर देताना डॉ . तात्याराव लहाने म्हणाले कि , आपल्याला कोरोना होणार नाही, या भ्रमात कोणीही राहू नये. करोना प्रतिबंधावर अजून लस यायची आहे. पण, मुखपट्टी हीच सध्या आपली लस आहे, असे डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. दुसरी लाट केव्हा येईल हे कोणीही सांगू शकत नाही. काळजी घेतली तर ती सौम्य प्रमाणात येईल. मला किडनी देऊन पुनर्जन्म देणारी आई आणि रुग्ण यांच्यामुळेच मला हा सन्मान मिळाला आहे. काळ कोणताही असो आपल्याला चांगलं काम करता येते, हेच महात्मा फुले यांच्याकडून शिकता येते, अशी भावना डॉ. लहाने यांनी व्यक्त केली. दरम्यान कोरोनासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत वैज्ञानिक निर्णय घेतले आहेत. त्यामुळेच लोकसंख्या जास्त असूनही आपल्याकडे मर्यादित प्रसार झाला, अशा शब्दांत त्यांनी सरकारचे कौतुक केले.

आपलं सरकार

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.