Corona Vaccine Update : कोविशील्ड कोरोना लसीच्या वितरणाबाबत सिरमच्या प्रमुखांचा खुलासा

Spread the love

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिरम इन्सिट्युटला भेट दिली. यानंतर सिरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी पत्रकार परिषद घेऊन कोविशिल्डच्या वितरणाबाबत महत्वाची माहिती दिली आहे .   त्यांनी म्हटले आहे कि , येत्या दोन आठवड्यात सिरम इन्स्टिट्युट भारत सरकारकडे तातडीच्या परवान्यासाठी अर्ज करणार आहे . या लशीचं वितरण हे सुरुवातीला भारतातच केलं जाईल. त्यानंतर कोव्हॅक्स देश म्हणजेच अफ्रिकेतील देशांमध्ये या  लशीचं वितरण केलं जाईल असंही अदर पुनावालांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्यातील  सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देऊन कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लस विकास, उत्पादन, वितरण, साठवण आणि व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. सायरस पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला, कार्यकारी संचालक नताशा पुनावाला, शास्त्रज्ञ तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी अदर पुनावाला यांनी संस्थेची माहिती दिली. त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया या संस्थेतील कोविड -१९ प्रतिबंधात्मक लस निर्मितीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांना लस देण्याच्या प्रयत्नांची पूर्वतयारी, आव्हाने आणि नियोजन यांची माहिती शास्त्रज्ञांनी दिली. सिरममधल्या शास्त्रज्ञांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे सव्वा तास चर्चा केली. सिरम इन्सिट्युटमध्ये ज्या लशीची निर्मिती केली जाते आहे ती लस चांगली आहे.ही लस घेतलेल्या व्यक्तीला करोना झाला तर रुग्णालयात दाखल करावं लागणार नाही. तसेच कोरोनाचा प्रसार ६० टक्क्यांपर्यंत कमी करता येणार आहे. असा विश्वास यावेळी अदर पुनावाला यांनी व्यक्त केला.

आतापर्यंत ४ कोटी डोसची निर्मिती

दरम्यान लोकांपर्यंत लस पोहचवण्याची तयारी आम्ही करतो आहोत. सर्व सामान्य जनतेला परवडेल अशीच लशीची किंमत असणार आहे असंही पुनावाला यांनी म्हटलं आहे.  जुलै २०२१ पर्यंत ३० ते ४० कोटी डोस उपलब्ध करणार असंही पुनावाला यांनी स्पष्ट केलं. अदर पुनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आतापर्यंत ४ कोटी डोसची निर्मिती झाली आहे. सिरम इन्स्टीट्युटने ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ असे ऑक्सफर्डने विकसित केलेल्या या लशीचे नाव आहे. ऑक्सफर्डने तयार केलेली ही लस ७० टक्के परिणामकारक आहे.

कोरोनाने फक्त भारतावर नाही तर संपूर्ण जगावर संकट आणलं आहे. अशात लस लवकरात लवकर तयार करण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरु आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करोना लशीची निर्मिती सुरु असलेल्या तीन प्रकल्पांना भेट दिली. पुण्यात आल्यानंतर त्यांनी कोविशिल्ड लशीची संपूर्ण माहिती घेतली. लशीच्या तिसऱ्या चाचणीवर आमचं लक्ष आहे असं अदर पुनावाला यांनी सांगितलं. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लशीबाबत संपूर्ण माहिती घेतली असंही अदर पुनावाला यांनी स्पष्ट केलं.

आपलं सरकार

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.