Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : राज्यात गेल्या 24 तासात 5965 नवे रुग्ण तर 3937 रुग्णांना डिस्चार्ज

Spread the love

राज्यात गेल्या २४ तासात  करोना बाधितांचा आकडा आज किंचित खाली असून दिवसभरात ५ हजार ९६५ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर ३ हजार ९३७ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत करोनाचे आणखी ७५ रुग्ण दगावले असून आतापर्यंत राज्यात कोरोनाने ४६ हजार ९८६ जणांचा बळी घेतला आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात दिवाळी नंतर कोरोना बाधित रुग्णांचा आकडा सातत्याने वाढता राहिला आहे. आज मात्र त्याच थोडीशी घट पाहायला मिळाली. राज्यात काल शुक्रवारी ६ हजार १८५ नवीन रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत आज ५ हजार ९६५ नवीन रुग्ण आढळले आहेत. करोनामृत्यूंचा आकडाही कमी झाला आहे. शुक्रवारी राज्यात ८५ मृत्यू झाले होते तर आज ७५ रुग्ण दगावले. सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.५९ % एवढा आहे.

दरम्यान आज दिवसभरात राज्यभरात ३ हजार ९३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आतापर्यंत एकूण १६ लाख ७६ हजार ५६४ करोना बाधित रुग्णांनी या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या ९२.४ % इतके झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ७ लाख २२ हजार १९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख १४ हजार ५१५ (१६.९२ टक्के ) नमुने करोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या प्रत्यक्षात ८९ हजार ९०५ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयांत उपचार सुरू आहे. राज्यात ५ लाख २८ हजार ४६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७ हजार ११८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

गेल्या आठ महिन्यांपासून करोनाशी लढा सुरू असून अजूनही करोनाचं संकट संपलेलं नाही. महाराष्ट्राने आधीच गुजरात, दिल्ली, राजस्थान आणि गोवा या चार राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना करोना चाचणी अहवालाची सक्ती केलेली आहे. विमानतळ व रेल्वे स्टेशन येथेही प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. करोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!