Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : तब्बल एक महिन्यानंतर बेपत्ता पाषाणकरांना पुणे पोलिसांनी शोधले

Spread the love

तब्बल एक महिन्यानंतर  पुण्यातील प्रसिद्ध पाषाणकर उद्योग समूहाचे प्रमुख गौतम पाषाणकर यांना शोधण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे.  काल बुधवारी पोलीस पाषाणकर यांना घेऊन पुण्यात दाखल झाले. २१ ऑक्टोबरला गौतम पाषाणकर अचानक बेपत्ता झाले होते. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर तपास सुरू असताना गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट समोर आली होती. सुसाईड नोटमध्ये त्यांनी व्यवसायातील आर्थिक नुकसानामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं. यानंतर शहरातील उद्योजक क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान पाषाणकर यांना आज पुण्यात आणल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. त्यांची चौकशी केल्यानंतर प्रथमदर्शनी ते आर्थिक कारणास्तव मानसिक तणावामध्ये असल्यानं आत्महत्या करण्याच्या विचारांनी ग्रासले होते. त्या कारणास्तव त्यांनी २१ सप्टेंबर रोजी पुणे शहर सोडल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. त्यानंतर पाषाणकर अनेक शहरांमध्ये गेले आणि २१ नोव्हेंबर रोजी ते जयपूर या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर युनिट १ गुन्हे शाखा पुणे येथील पथकानं त्यांचा शोध घेत त्यांना तेथील हॉटेलमधून ताब्यात घेतलं. दरम्यान त्यांचे बेपत्ता होण्यामागे अन्य कोणतेही कारण नसल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलं.

गौतम पाषाणकर बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबाने तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून युनिट १ या प्रकरणाचा तपास करत होते. पोलीस निरीक्षक ताकवले यांना गौतम पाषाणकर राज्याबाहेर गेले असावेत अशी माहिती त्यांच्या सूत्रांकडून मिळाली होती. त्यादृष्टीने तपास सुरु होता. मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जयपूर येथील एका हॉटेलमध्ये गौतम पाषाणकर असल्याची माहित युनिट १ गुन्हे शाखेला मिळाली होती. गौतम पाषाणकर २१ ऑक्टोबरला बेपत्ता झाले होते. तपास सुरू असताना चालकाकडे दिलेल्या लिफाफ्यात सुसाईट नोट असल्याचं आढळून आलं. मागील काही दिवसापासुन व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं त्यांनी त्यात लिहिलं होतं.

“गौतम पाषाणकर हे बुधवारी नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर पडले होते. पाषाणकर हे लोणी काळभोर येथील गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये गेले. तेथून ते शिवाजीनगर येथील ऑफिसमध्ये आल्यावर एक बंद लिफाफा चालकाकडे दिला आणि हे घरी देण्यास सांगितले. चालक लिफाफा देण्यासाठी घरी गेला. त्यानंतर पाषाणकर ऑफिस मधून बाहेर पडले आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिशेने चालत निघून गेले. गौतम पाषाणकर घरी न आल्याने कुटुंबीयांनी अखेर पोलीस स्थानकात धाव घेतली,” अशी माहिती पोलिसांनी दिली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!