Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ताजी बातमी : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीचे छापे

Spread the love

शिवेसनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापे टाकले आले आहेत .  त्याचबरोबर प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विंहग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं असल्याचं वृत्त आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई केल्याची शक्यता आहे. मात्र अद्याप ईडीकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही. दिल्लीहून आलेली ईडीची टीम ही कारवाई करत आहे. दरम्यान ईडीची ही कारवाई राजकीय सुडापोटी केल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे.


याविषयीची अधिक माहिती अशी कि ,  प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात ईडीचं पथक दाखल झालं आहे. सकाळी आठ वाजता ही कारवाई करण्यात आली असून एकूण १० ठिकाणी धाड टाकण्यात आली आहे. कारवाईचं नेमकं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत. प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे इतर नेतेही ईडीच्या रडारवर असल्याची शक्यता आहे. दरम्यान आमदार प्रताप सरनाईक यांचे दोन्ही चिरंजीव विहंग आणि पुर्वेश यांच्या घरी आणि प्रताप सरनाईक यांच्या व्यावसायिक कार्यालयावरही ईडीने धाड टाकली आहे.

एकूण दहा ठिकाणी मुंबई, ठाणे परिसरातही ईडीकडून शोध सुरु आहे. टॉप ग्रुपसंबंधी ही कारवाई करण्यात आली आहे. टॉप ग्रुपचे प्रमोटर्स आणि सदस्यांच्या घरी आणि कार्यालयात ही शोधमोहीम सुरु आहे. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत. सरनाईक हे ठाण्यातील ओव्हळा-माजीवाडा विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. ते मीरा-भाईंदर परिसराचे शिवसेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते आहेत. ईडीच्या कारवाईमुळे शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. प्रताप सरनाईक यांच्या सोबतच शिवसेनेच्या आणखी एका दिग्गज नेत्याला ईडीने नोटीस बजावल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र, या संदर्भात अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

या धाडीबाबत न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना प्रताप सरनाईक यांनी ईडीच्या कारवाईचा निषेध केला आहे. ‘मी सध्या मुंबईच्या बाहेर आहे. मला ईडीकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. पण तरीही छापा टाकण्यात आला आहे, असा आरोप सरनाईक यांनी केला आहे. आज सकाळी ७.३० च्या सुमारास ईडीचे पथक ठाण्यातील प्रताप सरनाईक यांच्या घरी पोहोचले होते. या पथकात ८ ते ९ अधिकारी आहे. त्याचबरोबर पुण्यातील सीआरपीएफचे पथक सुद्धा  तैनात करण्यात आले आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरनाईक यांच्या घरावर ईडीने टाकलेल्या छाप्याचा निषेध केला आहे. तर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी या घटनेशी भाजपचा कोणताही संबंध नाही, असं स्पष्ट केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!