Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राज्यात पुन्हा निर्बंध लागू होण्याची शक्यता , विजय वडेट्टीवार यांचे संकेत

Spread the love

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने दुसरी लाट येण्याची भीती गडद होत चालली आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात राज्यातील रुग्णसंख्येनं ५ हजारांच्या सरासरीनं उसळी घेतल्यानं राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. तसे संकेत राज्याचे  मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. “राज्यातील करोना स्थितीचा आढावा घेतला जात आहे. आठ दिवस अंदाज घेऊन काही निर्बंध आणता येतील का? याचा विचार सुरु आहे. शेवटी जीव वाचवणं महत्त्वाचं आहे,” असे  वडेट्टीवार म्हणाले.

“राज्यात कोरोना रुग्णांचे आकडे वाढत आहेत. त्यामुळे खबरदारी घेणं महत्वाचं आहे. सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु करण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. सर्व अभ्यास करुन निर्णय घेतले जातील. मुंबई कॉस्मोपॉलिटीन शहर आहे. अनेक राज्यांमधून इथं लोक येतात. त्यामुळे पुढचे आठ दिवस परिस्थिती पाहिली जाईल. त्यानंतर रेल्वे आणि विमानसेवा, तसंच क्वारंटाईनबाबत काही कडक निर्बंध आणावे लागतील, महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं करोनाचा अटकाव केला गेला, तसं काम कुठेही झालेलं नाही. मुंबईत एवढी गर्दी असतानाही राज्य सरकारनं चांगलं काम केलं आहे. दाट वस्ती असलेल्या भागातील कामाचं केंद्र सरकारनेही कौतुक केलं. राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या कामाचं आणि उपाययोजनांचंही कौतुक केलं आहे,” असं वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान वीजबिलाच्या मुद्यावरून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपाकडून लावून धरण्यात आलेल्या वीजबिलाच्या मुद्यावरही वडेट्टीवार यांनी भूमिका मांडली. “वीजबिलाच्या मुद्द्यावरील भाजपाचं आंदोलन म्हणजे ढोंगीपणा आहे. त्यांच्या सरकारच्या काळातच वीज थकबाकी वाढली. त्यामुळेच ऊर्जा विभागाची स्थिती बिकट झाली,” असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!