Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

JalnaNewsUpdate : जालना जिल्ह्यात आणखी दोन तरुणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Spread the love

जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यात चार दिवसांपूर्वी तीन सख्ख्या भावाचा मृत्यू  झाल्यानंतर आणखी एक अशीच घटना घडली असून या दुर्घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे . जालना जिल्ह्यातील  बदनापूर तालुक्यातील कुसळी शिवारात ही ह्रदयद्रावक घटना घडली आहे. तब्बल २० तासांच्या अथक परिश्रमानंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे. प्रदीप वैद्य आणि गणेश तार्डे अशी या मयत तरुणांची नावं आहेत. शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंप  दुरुस्त करून विहिरीतील पाण्यात सोडताना अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने विजेचा धक्का बसल्याने हि घटना घडली.

या विषयीची अधिक माहिती अशी कि , भाऊसाहेब वैद्य यांच्या शेतातील विहीर काठोकाठ भरली आहे. शेतात सध्या पिकांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. त्यात विहिरीतील विद्युत पंप नादुरुस्त झाल्याने हे दोघे विद्युत पंप विहिरीत सोडत असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाला आणि दोघांना जबर विजेचा धक्का लागला, त्यानंतर दोघेही जण विहिरीत कोसळले, दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले.  अग्निशमन दल व बदनापूर पोलिसांच्या मदतीतून तब्बल २० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं.

दरम्यान चार  दिवसांपूर्वी भोकरदन तालुक्यातील पळसखेडा येथे तिघा भावंडांचा वीजेचा धक्का  लागून विहिरीत पडून मृत्यू झाला होता.पळसखेडा येथील ज्ञानेश्वर जाधव, रामेश्वर जाधव आणि सुनील जाधव ही तिघे भावंडे शेतातील गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. मोटर चालू करताना एकला जबरदस्त शॉक बसला. तो विहिरीत पडला. दरम्यान, त्याला वाचविण्यासाठी इतर दोघा भावांनी देखील विहिरीत उडी घातली. या घटनेत तिघा भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.  ही घटना ताजीच असताना पुन्हा कुसळी येथे दोघे आते-मामा भाऊ पाण्यात बुडल्याची हि दुर्दैवी घटना घडली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!