Spread the love

बाबा गाडे


औरंगाबाद विभाग पदवीधर संघाची निवडणूक महाविकास आघाडी आणि भाजपसाठी  प्रतिष्ठेची असून या निमित्ताने वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम हे दोन्हीही पक्ष आपली ताकद अजमावत आहेत. विशेष म्हणजे वंचितने आपल्या ओबीसी उमेदवार दिला आहे तर एमआयएमनेही गैर मुस्लिम उमेदवार दिला आहे. मराठवाड्यातील ३५ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. यात भाजपच्या कार्यकर्त्याने बंडखोरी केल्यामुळे तर भाजपचे ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपाला धडा शिकवण्याचा निर्धार केल्यामुळे बीड , उस्मानाबाद , लातूर मधून भाजप उमेदवारांसमोर कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. यंदाच्या निवडणुकीविषयी एका वाक्यात सांगायचे तर ” हि पाडापाडीची निवडणूक आहे !!”  कारण अलीकडच्या काळात प्रत्येक पक्षातील इच्छुक उमेदवारांची स्वतः पुढे जाण्याची भावना लक्षात घेता पक्षीय विजयापेक्षा स्वतःचा विजय आणि ज्याला पक्षाचे तिकीट मिळाले त्याचा पराभव हा कार्यकर्त्यांचा राजकीय स्वभाव झाला आहे. त्यामुळे प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना विरोधी उमेदवारापेक्षा स्वकियांचीच भीती अधिक आहे.


या वर्षीच्या निवडणुकीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एमआयएम आणि  गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या नाकात दम आणणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार पहिल्यांदा मैदानात उतरवले आहेत. दरम्यान हि पदवीधरांची निवडणूक असल्यामुळे मुस्लिम पदवीधर मतदार एमआयएमकडे झुकणार कि , महाविकास आघाडीकडे  ? याचा अंदाज  बांधणे कठीण आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडीबरोबर आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेचाही उमेदवार मैदानात असल्यामुळे आंबेडकरी मतांचे विभाजनही अटळ मानले जात आहे. जाणकारांच्या मते ओबीसी मतांचे विभाजन वंचित , महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात होऊ शकते तर मराठा कार्ड म्हणून आणि सर्व स्तरातून मते मिळविणारे उमेदवार म्हणून सतीश चव्हाण यांच्याकडे बघता येते. त्यामुळे मागील निवडणुकीच्या तुलनेने त्यांना फार फरक पडेल असे वाटत नाही . कारण यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शिवसेना आणि काँग्रेसची प्लस मते हि त्यांची जमेची बाजू आहे . त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिरीष बोराळकर यांना भाजपच्या कमिटेड मतांमची खात्री असली तरी या तिकिटासाठी इच्छुक असलेले उमेदवार त्यांना विजयासाठी मदत करतील याची खात्री देता येत नाही .

खरे तर पदवीधर मतदार संघाची व्याप्ती लक्षात घेता मिळालेल्या वेळेत प्रचार करणे जिकिरीचे काम आहे . त्यात आता प्रचारासाठी जेम तेम आठवड्याचा कालावधी उरला आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख उमेदवार युद्धपातळीवर प्रचार करण्यात गुंतले आहेत . वंचित बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही हि निवडणूक अत्यन्त गांभीर्याने घेत आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नुकताच मराठवाड्याचा दौरा पूर्ण केला आहे. तर भाजप , सेना , राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते आपापल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. वंचितचा उमेदवार नवखा असला तरी त्याला प्रकाश आंबेडकर यांच्या समर्थकांचा चेहरा आहे . त्यामुळे मागच्यावेळी एक गठ्ठा सतीश चव्हाण यांच्याकडे गेलेली मते यंदा वंचितकडे वळू शकतात. परंतु शिवसेना आणि भाजपच्या विचारधारेच्या विरोधातील मते सतीश चव्हाण यांना मिळू शकतात.

मतदार संघातील एकूण जिल्हानिहाय मते

औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या अंतीम मतदार यादीमध्ये १२ नोव्हेंबरपर्यंत  एकूण ३ लाख ७३ हजार ४८५ मतदारांची नोंदणी झाली आहे. येत्या एक डिसेंबर रोजी औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होत आहे. एकूण  ३ लाख ७३ हजार ४८५ मतदारांमध्ये दोन लाख ८६ हजार ५४३ पुरुष, तर ८६ हजार ९३७ स्त्री मतदार आहेत. अंतिम मतदार यादीनुसार सर्वाधिक १ लाख ६ हजार ५०० मतदार हे औरंगाबाद जिल्ह्यात असून हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे केवळ १६ हजार ७७४ मतदार आहेत. पदवीधर निवडणुकीसाठी यापूर्वीची मतदार यादी रद्द ठरवण्यात आल्यामुळे यंदा नवीन मतदार यादी तयार करण्यात आली आहे, दरम्यान प्रारंभीच्या कालावधीमध्ये अत्यल्प प्रतिसाद मिळालेली मतदार नोंदणी कोरोनाच्या काळातही आता ३ लाख ७३ हजारांवर गेली आहे.

मराठवाड्यातील जिल्हानिहाय मतदार संख्या पुढील प्रमाणे आहे. यातील पहिला आकडा पुरुष मतदारांचा दुसरा स्त्री मतदारांचा तर तिसरा आकडा एकूण मतदारांचा आहे.

 

औरंगाबाद । ७५,०६९ । ३१,४२९ । १,०६,५००

जालना । २४,२७० । ५,५२० । २९,७९०

परभणी । २५,९६५ । ६,७७० । ३२,७३५

हिंगोली । १३, ६४१ । ३, १३३ । १६, ७७४

नांदेड । ३८, ५१७ । १०, ८४७ । ४९, ३६५

लातूर । ३२, १७८ । ९, ०६९ । ४१, २४९

उस्मानाबाद । २६, ५९३ । ७, ०४३ । ३३, ६३६

बीड । ५०, ३१० । १३, १२६ । ६३, ४३६

एकूण । २, ८६, ५४३ । ८६, ९३७ । ३, ७३, ४८५

आपलं सरकार

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.