Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एका जवानाला वीर मरण

Spread the love

पाकिस्तानकडून  जम्मूमध्ये झालेल्या  भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक जवान शहीद झाला. करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील संग्राम शिवाजी पाटील  याला शुक्रवारी मध्यरात्री वीरमरण आले. ही बातमी गावात कळताच परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान  ऐन दिवाळीतच आठ दिवसापूर्वी पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील जवान ऋषिकेश जोंधळे यास वीरमरण आले होते. दिवाळीच्याच  दिवशी त्याच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी मध्यरात्री कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक जवान जम्मू मध्ये शहीद झाला. शाहिद जवान संग्राम पाटील हा सैन्यदलातील ‘१६ मराठा बटालियन’मध्ये कार्यरत होता. अठरा वर्षांपूर्वी सैन्यदलात भरती झालेल्या संग्रामची १७ वर्षाची मुदत गेल्या वर्षी संपली होती. सतरा वर्षे देश सेवा केल्यानंतर आणखी दोन वर्षे त्याने मुदत वाढवून घेतली होती. पण शुक्रवारी पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात त्याला वीरमरण आले.

संग्राम डिसेंबर महिन्यात सुट्टीला गावी येणार होता. त्याने मित्रांना तसे कळवले होते. गावात त्याच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. वेळोवेळी फोन करून तो घराच्या बांधकामाबाबत चौकशी करत होता, पण नवीन घरात राहण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही. आई-वडिलांना एकुलता एक असलेल्या संग्रामला वीरमरण आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई-वडील पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. रविवारी रात्री किंवा सोमवारी सकाळी त्याचे पार्थिव कोल्हापुरात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर गावात त्याच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!