Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : मंदिरात दर्शनासाठी जाताय तर सावधान !! पाळावे लागतील हे कठोर नियम….

Spread the love

राज्यातील मंदिरं आणि सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे उद्यापासून सुरु होत आहेत . राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे . कोरोनाच्या संसर्गामध्ये मार्चपासून धार्मिकस्थळे बंद असल्याने महाराष्ट्र अनलॉक होत असताना राज्यातील प्रार्थनास्थळे सुरु करण्याच्या मागणीसाठी बरेच राजकारण झाले होते. दरम्यान याच  प्रश्नावरून राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात पत्राद्वारे शाब्दिक चकमकही उडाली होती.  वंचित बहुजन आघाडी , मनस, भाजप यांनी या प्रश्नावरून रान उठविताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठी टीका केली होती . मात्र नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून प्रार्थनास्थळे उघण्याबाबत  मुख्यमंत्र्यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली होती. सर्वांचे बोलून झाल्यावर अचानक आता दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांनी  सर्व धार्मिक स्थळे उघण्याची घोषणा केली काल शनिवारी केली आहे.


राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील पंढरपूर , शिर्डी , तुळजापूर , कोल्हापूर ,  मुंबईतील सिद्धिविनायक , हाजी अली या धार्मिक स्थळांवर मोठी गर्दी होणार असली तरी कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासनाने त्या त्या मंदिर व्यवस्थापनावर टाकली आहे . मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर करताच या विषयावरून आंदोलन करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत हा आपल्याच आंदोलनाचा विजय असल्याचे म्हटले आहे.

तरीही विठुरायाचे दुरूनच दर्शन

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निर्णयाचे वारकरी संप्रदायाने स्वागत करताना आता मर्यादित संख्येत करोनाचे नियम पाळून भजन-कीर्तनासही परवानगी देण्याची मागणी केली. दरम्यान, शासनाच्या मार्गदर्शक सूचना मिळताच भाविकांच्या दर्शन व्यवस्थेसाठी आम्ही सज्ज असून आमची तयारी यापूर्वीच झाल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले. मंदिरात येणाऱ्या भाविकाला मास्क बंधनकारक केला जाणार असून दर्शन रांगेत सोशल डिस्टन्सचे नियम पाळण्यासाठी रोज दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या संख्येवर मर्यादा येणार आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी रोज ७० ते ८० हजार भाविक येत असतात आता मात्र काही दिवस दीड ते दोन हजार भाविकांची दर्शन व्यवस्था करणेच मंदिर प्रशासनाला शक्य होणार आहे. याचसोबत सुरुवातीला काही दिवस विठुरायाचे दुरून दर्शन घ्यावे लागणार असून याबाबत राज्य सरकारच्या सूचना मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे पुदलवाड यांनी सांगितले.

महालक्षमी मंदिर , कोल्हापूर 

अशा आहेत शासनाच्या प्रमुख मार्गदर्शक सूचना 

शासनाच्या आदेशानुसार कंटेन्मेंट झोन बाहेरील धार्मिक स्थळे उघडण्यासच तूर्त परवानगी देण्यात आली आहे. शासनाने केलेल्या सूचना पुढील प्रमाणे आहेत.

१. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि १० वर्षांखालील लहान मुलांना प्रार्थनास्थळांमध्ये घेऊन जाऊ नये, अशी प्रमुख सूचना करण्यात आली आहे.

२.  दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फुटांचे अंतर राखणे बंधनकारक असेल.

३.  मूर्ती, पुतळे वा पवित्र धर्मग्रंथाला स्पर्श करण्याचे टाळावे.

४.  प्रसादाचे वाटप तसेच पवित्र जलाचे शिंपण टाळावे. ज्या ठिकाणि अन्नदान होते अशा ठिकाणी प्रामुख्याने सुरक्षित वावर राखला जाईल याची काळजी घ्यावी.

५.  परिसरात कोविड विषयी जनजागृती करणारे माहिती फलक लावावेत. मार्गदर्शक सूचनांची माहिती देणारी एखादी ऑडिओ कॅसेटही लावली जावी.

६.  प्रार्थनास्थळांमध्ये असलेली मोकळी जागा, व्हेंटिलेशनची उपलब्धता या सर्व गोष्टींचा अभ्यास करून किती गर्दी प्रार्थनास्थळांमध्ये असायला हवी याचे नियोजन केले जावे.

७.  अन्य ठिकाणी जशी तोंडावर मास्क, सॅनिटायझेशन, सुरक्षित वावर याप्रकारची काळजी घेतली जाते, तशीच काळजी येथेही घ्यावी व अन्य दक्षताही बाळगावी.

८.  प्रार्थनास्थळांमध्ये जाण्याआधी चप्पल, बूट आपापल्या गाडीमध्येच काढून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसा पर्याय नसल्यास प्रत्येकाने आपले, तसेच आपल्या कुटुंबीयांच्या चपला, बूट स्वतःहून वेगळ्या ठिकाणी ठेवता येईल, अशी व्यवस्था करावी.

९.  मंदिरांच्या बाहेर पार्किंगमध्ये गर्दी होणार नाही, परिसरातील इतर दुकाने, कॅफेटेरियामध्ये देखील सुरक्षित वावर राखला जाईल याची काळजी घ्यावी.

१०.  प्रार्थनास्थळांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकाने हात आणि पाय स्वच्छ धुणे आवश्यक.

११. मंदिर प्रवेशाच्या वेळी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचे तापमान आणि ऑक्सिजन लेवल तपासण्यात यावी.

तुळजाभवानी मंदिर , तुळजापूर 

शिर्डीत येणाऱ्या भक्तांसाठी लागू असणारे नियम 

१. पहाटेच्या काकड आरतीपासून भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे.

२. दर्शनासाठी भाविकांना ऑनलाइन पास घ्यावा लागणार आहे.

३. ठरवून देण्यात आलेली वेळ आणि तारखेनुसार भाविकांना दर्शन दिलं जाणार आहे.

४. ३००० भाविकांना ऑनलाइन पेड पास दिला जाणार आहे.

५. एरव्ही आरतीसाठी २५० ते ३०० भाविक उपस्थित असत. मात्र यावेळी आरतीसाठी ५० जणांनाच सहभागी होता जाणार आहे. आरतीसाठी पास आरक्षित असणार आहे.

६. हार, फुलं, प्रसाद मंदिरात नेता येणार नाही. समाधीला हात न लावता दर्शन घेता येणार.

७. मोबाइल आणि इतर वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

८. आरतीनंतर गावकऱ्यांना दर्शनासाठी विशेष प्रवेश दिला जाणार. मतदार ओळखपत्र दाखवल्यानंरच प्रवेश दिला जाईल.

९. ६५ वर्षांवरील नागरिक, १० वर्षांखालील मुले, व्याधीग्रस्त तसेच गर्भवतींना प्रवेश दिला जाणार नाही. राज्य सरकारनेच तसा आदेश दिला आहे.

१०. साई निवास व्यवस्थेसाठी ऑनलाइन बुकिंग करावी लागणार आहे.

११. मास्क बंधनकारक असणार आहे.

१२. थर्मल स्क्रिनिंग आणि नियम पाळणं बंधनकारक आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!