Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathawadaNewsUpdate : औरंगाबाद पदवीधर निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून आ. सतीश चव्हाण तर भाजपमध्ये मात्र बंडखोरी

Spread the love

राज्यात दिवाळीबरोबरच विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची धूम सुरु झाली आहे . आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.  राष्ट्रवादीकडून अखेरच्या दिवशी औरंगाबादमधून  सतीश चव्हाण  यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे. तर पुण्यातून अरुण लाड  यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान  भाजप आणि काँग्रेसकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतर अखेरच्या क्षणाला राष्ट्रवादीकडून औरंगाबाद आणि पुणे पदवीधर मतदारसंघासाठी नावे  जाहीर करण्यात आली आहे. पुढील महिन्यात १ डिसेंबर रोजी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे. दरम्यान भाजपमध्ये मात्र शिरीष बोराळकर यांच्या उमेदवारीला बंडखोरी करीत दोन उमेदवारांनी आव्हान दिले आहे.


यामध्ये औरंगाबादमधून पुन्हा एकदा सतीश चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे. मागील निवडणुकीत सतीश चव्हाण आणि भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यात लढत झाली होती. यावेळी सतीश चव्हाण यांनी शिरीष बोराळकर  यांचा पराभव केला होता. त्यामुळे भाजपकडूनही पुन्हा बोराळकर यांनाच संधी देण्यात आली आहे.

पुण्यात भाजपकडून पुणे पदवीधरसाठी संग्राम देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या जागेसाठी  महापौर मुरलीधर मोहोळ, रवींद्र भेगडे, अभाविपचे राजेश पांडे यांच्याही नावाची चर्चा होती पण, अखेर सर्व नावे वगळून सांगलीच्या संग्राम देशमुख यांचे नाव जाहीर झाले आहे. त्यामुळे पुण्यात अरुण लाड विरुद्ध संग्राम देशमुख सामना रंगणार आहे.

सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी घोषित होताच आज आ. सतीश चव्हाण यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडीकडून प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब, आरोग्य मंत्री राजेश टोपे,  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, माजी खा. चंद्रकांत खैरे , राज्यमंत्री संदीपान भुमरे,  आ विक्रम काळे,  आ. संजय दौड,  नरेंद्र  काळे,  माजी महापौर नंदकुमार घोडेले, अभिजित देशमुख,  संजय निंबाळकर, प्रशांत हुरणे  यांच्यासह अनेक पदाधिकारी, शिक्षक आणि पदवीधर मतदार उपस्थित होते.

भाजपमधील बहुजन कार्यकर्ते आक्रमक

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून अधिकृतपणे शिरीष बोराळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर  या मतदारसंघात भाजपच्या दोन इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपला हि डोकेदुखी ठरणार कि काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये बीड जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष रमेश पोकळे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. रमेश पोकळे हे पंकजा मुंडे गटाचे समर्थक मानले जातात. आपली उमेदवारी दाखल करताना पोकळे यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा जयघोष केला तर दुसरे बंडखोर उमेदवार प्रवीण घुगे यांनीही आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपच्या वतीने अधिकृत उमेदवारी शिरीष बोराळकर यांना जाहीर केली असली तरी दोन जणांनी अर्ज भरल्याने पक्ष श्रेष्ठींसमोर पेच निर्माण झाला आहे. दरम्यान असे असले तरी भाजपचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे , माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

भाजपचे अंतर्गत राजकारण

औरंगाबाद विभागात आपल्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी म्हणून माजी मंत्री पंकजा मुंडे  प्रयत्नशील होत्या. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उद्योजक किशोर शितोळे यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील होते. तर देवेंद्र फडणवीस  शिरीष बोराळकर यांच्यासाठी आग्रही होते . या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद दौऱ्यावर येऊन हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता त्यानुसार शितोळे शांत झाले पण इतर दोन उमेदवार पोकळे आणि घुगे यांनी मात्र अखेरच्या क्षणापर्यंत पक्षांतर्गत लढाई लढविण्याचे ठरविले असल्याचे चित्र आहे. बहुजन समाजाचा उमेदवार म्हणून प्रवीण घुगे यांनाच उमेदवारी द्यावी असा मराठवाड्यातील कार्यकर्त्यांचा आग्रह आहे.  भाजपच्या १२ पैकी ११ नेत्यांचे आपल्याला समर्थन असून त्यांच्या आदेशावरूनच आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल करीत असल्याचे घुगे यांनी म्हटले आहे.

दरम्यान गेली बारा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व असणाऱ्या या पदवीधर मतदारसंघात विजय खेचून आणण्यासाठी पक्षाची एकसंघ ताकद आम्ही उभी करू आणि नक्की विजय प्राप्त करू असा विश्वास प्रवीण घुगे यांनी व्यक्त केला . मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता असल्या मुळे पूर्ण ताकद पणाला लावून मराठवाडा पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निश्चित पराभव करणार याची खात्री असल्याचे प्रतिपादन प्रवीण घुगे यांनी केले .

 

 

Click to listen highlighted text!