Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AnavayNaikSuicideCase : मोठी बातमी : अर्णब गोस्वामी प्रकरणात त्याच्या वकिलांनी केला मोठा आरोप, सर्वोच्च न्यायालयात आज काय झाले ?

Spread the love

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या अर्णब गोस्वामीला जामिनावर सोडण्यासाठी त्यांच्या वकिलांकडून प्रयत्नांची पराकाष्टा केली जात आहे . त्याला  तातडीने अंतरिम जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर हे प्रकरण अलिबागच्या जिल्हा व सत्र न्यायालयात प्रलंबित असताना,  मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होत आहे.

दरम्यान  या प्रकरणात युक्तिवाद करताना अर्णबचे वकील हरीश साळवे यांनी अन्वय नाईक यांची कंपनी सात वर्षांपासून आर्थिक अडचणीत होती. त्यामुळे अन्वय नाईक यांनी आपल्या आईची हत्या करुन मग आत्महत्या केली असावी, असे  म्हटले आहे . त्यामुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पोलीस तपासात मात्र अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद नाईक या दोघांच्या मृत्यूची नोंद आत्महत्या अशीच आहे.

हरिश साळवे यांनीयावेळी अर्णब गोस्वामी आणि रिपब्लिक टीव्हीविरोधात नुकत्याच दाखल झालेल्या गुन्ह्यांचा दाखला दिला. ते म्हणाले की, “एकामागोमाग एक गुन्हे दाखल केले जात आहेत. हे प्रकरण गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरुन पुन्हा सुरु करण्यात आलं. दंडाधिकाऱ्यांना अर्णब गोस्वामी यांना वैयक्तिक बॉण्डवर सोडून द्यायला हवं होतं. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं पाहिजे.” तसंच अर्णब गोस्वामी यांची सुटका केली तर आभाळ कोसळणार नाही,” असंही साळवे म्हणाले.

इंटेरिअर डिझायनर  अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आत्महत्या करत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांच्या तक्रारीनंतर अलिबागमध्ये 306 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अलिबाग पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हरीश साळवे यांचा धक्कादायक युक्तिवाद

अर्णब गोस्वामी यांच्या वतीने हरिश साळवे बाजू मांडत असून यावेळी त्यांनी युक्तिवाद करताना अन्वय नाईक यांनी कशा पद्धतीने आपल्या आईची हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली हे सांगितलं. याशिवाय अर्णब गोस्वामी यांनी सर्वांचे पैसे दिले होते हे कागदपत्रांमधून स्पष्ट होत असल्याचा दावाही केला. अन्वय नाईक यांची कंपनी Concorde designs सात वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सुनावणीदरम्यान, हरिश साळवे यांनी याप्रकरणी सीबीआय चौकशी केली जावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली.

न्यायालयालय काय म्हणाले ? मी त्याचे चॅनल पाहात नाही , पण ….

यावर आपले मत देताना न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले कि , “जर या प्रकरणात न्यायालयानं हस्तक्षेप केला नाही तर ते चुकीच्या मार्गानं पुढे जाईल. तुमची विचारधारा वेगळी असू शकते. परंतु न्यायालयाला स्वातंत्र्याचं रक्षण करण्याची आवश्यकता आहे. जर न्यायालय स्वातंत्र्याचं रक्षण करणार नाही तर कोण करेल? तुम्हाला त्यांची विचारधारा आवडत नाही असं होऊ शकतं. माझ्यावर सोडा. मी त्यांची वाहिनी पाहत नाही. परंतु जर उच्च न्यायालय जामीन देत नाही तर त्या नागरिकाला तुरूंगात टाकलं जातं. आम्हाला एक कठोर संदेश द्यायला हवा. पीडित व्यक्तीला एका निष्पक्ष चौकशीचा अधिकार आहे. तपास सुरू राहू द्या. परंतु राज्य सरकारं या आधारावर व्यक्तींना लक्ष्य करत राहिली तर एक कठोर संदेश बाहेर जायला हवा. आपली लोकशाही ही लवचिक आहे. महाराष्ट्र सरकारने काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवं. जर कोणाच्या खासगी स्वातंत्र्यावर घाला घातला गेला तर तो न्यायावर केलेला आघात होईल,” असंही न्यायालयानं सुनावणीदरम्यान नमूद केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!