Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : दोन वाहकांच्या आत्महत्येनंतर सरकारला आली जाग , म्हणाले तासाभरात जमा होईल पगार !!

Spread the love

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांचा पगार थकला आहे. त्यात या महिन्याचा पगार तासाभरात केला जाईल अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. दिवाळीपूर्वी आणखी एका महिन्याचा पगार देण्याचेही त्यांनी आश्वासन दिले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याचा पगार देण्यासाठी पत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने पत्रक जारी केले आहे.  दरम्यान जळगावमध्ये एसटी कंडक्टरने आत्महत्या केल्यानंतर खडबडून जाग आलेल्या ठाकरे सरकारने लगेचच एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस आणि एक महिन्यांचा पगार देण्याची घोषणा केली आहे.


गेल्या दोन दिवसात जळगावमधील मनोज अनिल चौधरी या एस.टी कंडक्टरसह दोघांनी आत्महत्या केली आहे. ‘एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार आहे. (शिवसेना) माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझ्या पीएफ आणि एलआयसी वीमा हा माझ्या कुटुंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा’ असा मजकूर मनोज चौधरी यांनी चिठ्ठीत लिहिला आहे.

दरम्यान या आत्महत्येचे तीव्र पडसाद उमटताच अनिल परब यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी महिन्याभराचे वेतन देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. ‘पुढील तासाभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. उरलेले थकीत वेतन हे लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल, त्यासाठी कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू आहे’, असंही परब यांनी स्पष्ट केले.

टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन

‘एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या सारखे कठोर पाऊल उचलू नये. तात्पुरत्या संकटातून आपण नक्की मार्ग काढू. पण दुःखी होऊन असे कोणतेही टोकाचं पाऊल उचलू नये. तुमच्या या निर्णयामुळे कुटुंबाला त्याचा त्रास होतो. कुटुंब रस्त्यावर येत असते, त्यामुळे कृपया करून असे पाऊल उचलू नका’, असं आवाहनही परब यांनी सर्व कर्मचाऱ्यांना केले. ‘एसटी महामंडळ सध्या आर्थिक अडचणीत सापडले आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी  बँकेकडे कर्ज पण मागितले आहे. टप्प्या- टप्प्याने सगळ्या गोष्टी होतील. राज्य शासनाकडेही पैसे मागितले आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बोलणं सुरू आहे. आता एसटीसाठी कोणतीही रक्कम थकीत नाही. राज्य शासनाला प्रस्ताव दिला असून काही दिवस तरी कर्मचाऱ्यांना पगार द्यावे’, अशी मागणीही परब यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांची सरकरवर टीका

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रखडलेल्या वेतनामुळे राज्यातल्या दोन एसटी  कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या घटनांनी राज्यात खळबळ उडालेली असताना त्यावर आता आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. वेतन न मिळाल्याने दोन एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या, या अतिशय वेदनादायी आणि मनाला अस्वस्थ करणार्‍या घटना आहे. अनेकदा पाठपुरावा करूनही सरकारने हालचाल केली नाही आता या आत्महत्येची जबाबदारी सरकार घेणार का? असा सवाल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला केला आहे.

या बाबत बोलताना फडणवीस म्हणाले, एसटी कर्मचार्‍यांच्या व्यथा आणि वेदनासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करून सुद्धा राज्य सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही दोन  कुटुंब उघड्यावर आली आहेत. आता तरी सरकारने जागे व्हावे. एसटी कर्मचार्‍यांची कुटुंब अतिशय हलाखीच्या स्थितीत आहेत.जळगाव आणि रत्नागिरीच्या या दोन घटनांसाठी जे दोषी आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करणार. या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार का असा सवाल त्यांनी केलाय.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!