Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneNewsUpdate : ” या ” कारचालकाला इतका माज ? वाहतूक पोलिसाला बोनेटवर फरफटत नेले !!

Spread the love

मुंबईमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसाला एका महिलेने मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच पिंपरी-चिंचवडमध्येही एका मुजोर  कार चालकाने आपले कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसाला गाडीच्या बोनेटवर बसवून एक किलोमिटरपर्यंत फरफटत नेल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. गुरुवारी संध्याकाळी चिंचवड चौकात घडलेल्या या प्रकारामुळे सर्वत्र संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान हा प्रकार घडत असताना वाहतूक पोलीस, रस्त्यावरील नागरिक या चालकाला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु  हा वाहनचालक कोणत्याही प्रकारे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

आबासाहेब सावंत असं या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून या प्रकारामुळे  सावंत यांच्या गुडघ्याला जखम झाली आहे. तर या मुजोर वाहनचालकांचे नाव युवराज किसन हनवते असे आहे . सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली  त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलीस कर्मचारी आबासाहेब सावंत हे चिंचवड एलप्रोज चौकात आपलं कर्तव्य बजावत होते. विनामास्क घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करत होते. या दरम्यान मोटार चालक आरोपी युवराज हा त्या भागातून जात असताना सावंत यांनी त्याला थांबण्यास सांगितलं. मात्र सावंत यांच्याकडे दुर्लक्ष करत आरोपी युवराजने मोटार पढे नेली. त्यामुळे मोटार थांबवण्यासाठी पोलीस कर्मचारी सावंत गाडीच्या समोर येऊन उभे राहिले आणि युवराज यांना खाली उतरण्यास सांगितलं. मात्र आरोपी युवराजने यावेळी काहीही न ऐकता सावंत यांच्या अंगावर गाडी घालून धूम स्टाईलने भरधाव वेगात गाडी पुढे नेली.

दरम्यान पोलीस कर्मचारी सावंत आपला जीव वाचवण्यासाठी गाडीच्या बोनेटला पकडून राहिले. गाडी थांबवण्याची वारंवार विनंती करत असतानाही युवराजने गाडी थांबवली नाही. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा प्रकार घडत असतान रस्त्यावरील नागरिकांनीही आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हा प्रकार कैद केला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी युवराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!