Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AmericaPresidentElection : निवडणुकीनंतर अमेरिकेत पोलिसांना मोठ्या राड्याची भीती , ५० जणांची धरपकड

Spread the love

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल अद्याप लागलेले नसले तरी अमेरिकेतील वातावरण चांगलेच गरम झाले आहे . डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. तर, दुसरीकडे ट्रम्प न्यायालयात गेले आहेत. दरम्यान  राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प समर्थक आणि विरोधकांची अमेरिकेत जोरदार निदर्शने सुरू झाली आहेत. हिंसाचार उफाळून येण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तर, विविध शहरातून ५०हून अधिकजणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यानच्या काळात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार अमेरिकेत लोकांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची खरेदी केली आहे त्यामुळे निवडणूक निकालाचा वाद पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


मतमोजणीत गोंधळ झाला असल्याचा आरोप ट्रम्प यांनी  केला  आहे त्यामुळे  ट्रम्प समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. ट्रम्प यांच्या समर्थकांनी डेट्रॉइट, मिशिगन आणि एरिजोना या भागातील मतमोजणी केंद्रावरही  गोंधळ घालत  डेट्राइटमध्ये मतमोजणी बंद करण्याची मागणी केली. फिनिक्समध्येही जवळपास १५० ट्रम्प समर्थक एकत्र आले होते. यातील काहीजणांकडे शस्त्रे होती. मॅरिकोपा काउंटी येथील मतमोजणी केंद्रावर त्यांनी गोंधळ सुरू केला. वाढत्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर येथील मतमोजणीही  रोखण्यात आली. डेनवरमध्ये पोलिसांसोबत झालेल्या संघर्षानंतर चार आंदोलकांना अटक केली. तर, मिनियापोलिसमध्ये वाहतूक कोंडी करणाऱ्या आंदोलकांना अटक करण्यात आली. न्यूयॉर्क बुधवारी रात्री उशिरा ५० जणांना अटक करण्यात आली. पोर्टलँडमध्ये आंदोलकांमुळे तणावात मोठी वाढ झाली. पोलिसांनी या भागात दंगलीची स्थिती असल्याचे जाहीर केले. यावेळी ११ जणांना अटक करण्यात आली. या आंदोलकांकडून हातोडे, रायफल्स जप्त करण्यात आल्या.

दरम्यान ट्रम्प समर्थकांसह विरोधकही रस्त्यांवर उतरले असून त्यांनी प्रत्येक मत मोजण्याची मागणी केली. वॉशिंग्टन स्केअर पार्कमध्ये शांततेत आंदोलन करणाऱ्या ६० जणांच्या अटकेनंतर तणाव निर्माण झाला. त्याआधी आंदोलकांनी ‘काउंट द व्होट’ अशी घोषणाबाजी केली. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांना २१४ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. तर, बायडन यांना २६४ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. पेन्सिलवेनिया, नॉर्थ कॅरोलिना आणि जॉर्जियामध्ये ट्रम्प आघाडीवर आहेत. तर, नेवादामध्ये बायडन आघाडीवर आहेत. नेवादा येथे ६ मते आहेत. त्यामुळे नेवादामध्ये बायडन विजयी झाल्यास त्यांना २७० चा जादूई आकडा गाठून विजय मिळवता येणार आहे. तर, ट्रम्प यांना चारही राज्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!