Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : एमआयएमचे प्रमुख खा . असदुद्दीन ओवैसी यांनी फ्रान्स प्रकरणावर दिली “हि” प्रतिक्रिया…

Spread the love

फ्रान्समधील एका शिक्षकाची पैगंबर मुहम्मद यांच्यावर बनवण्यात आलेल्या कार्टूननंतर हत्या झाल्यानंतर चर्चमध्ये घुसून दहशतवादी हल्ल्याची घटना घडली असून  जगभरातील मुस्लिम जगतात याचे पडसाद उमटत आहेत. दरम्यान ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे  प्रमुख असदुद्दीन ओवेसी  यांनी फ्रान्समध्ये झालेली दहशतवादी घटना चुकीची असल्याचे म्हटले आहे. जिहादच्या नावावर निष्पापांचा जीव घेणारे केवळ खूनी आहेत, असे ओवेसी म्हणाले. इस्लाम याचे समर्थन करत नाही. तुम्ही जेथे राहता तेथील कायदा तुम्ही आपला मानला पाहिजे. तुम्ही कोणाचा जीव घेऊ शकत नाही, असे ते पुढे म्हणाले.

एक खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना ओवेसी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. पैगंबर मोहम्मद साहेब यांच्यावर कार्टून बनवल्याचे पाहून आपल्याला अतिशय त्रास झाला. मात्र, हिंसेची घटना चुकीची आहे, असे ओवेसी म्हणाले. भारतातील प्रसिद्ध उर्दू कवी मुनव्वर राणा यांनी देखील फ्रान्समधील घटनेचे समर्थन केले होते. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . फ्रान्सच्या या  घटनेवर भाष्य करताना अनेकजण या हत्येचे समर्थन करत आहेत तर अनेक नेत्यांकडून या हल्ल्याची कठोर निंदाही करण्यात येत आहे.

फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील एक शिक्षक सॅम्युएल पॅटी यांनी फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन या विषयावर वर्गात शार्ली एब्दो येथे छापण्यात आलेल्या पैगंबर मोहम्मद साहेब यांचे कार्टून दाखवले होते. हे कार्टून पाहून राग आलेल्या एका विद्यार्थ्याने शिक्षकाचे धड शरीरापासून वेगळे केले. या नंतर फ्रान्सने इस्लामी कट्टरपंथीयांविरोधात कठोर कारवाईचा बडगा उगारला. यानंतर जगातील मुस्लिम देशांनी फ्रान्सचा निषेध केला. फ्रान्सचे राष्ट्रपती इम्मॅन्युएल मॅक्रॉन यांचाही निषेध होऊ लागला. दरम्यान गेल्या आठवड्यात फ्रान्समधील नीस शहरात एका दहशतवाद्याने चर्चमध्ये घुसून ३ लोकांची चाकूने वार करत हत्या केली. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, अल्लाह-हू-अकबर असे ओरडत हा हल्लेखोर हल्ला करत होता. त्यानंतर फ्रान्सच्या लियोन शहरात एका पाद्र्याला चर्चबाहेर गोळी मारण्यात आली. यात पाद्री गंभीर जखमी झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!