Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : अर्थकारण : देशाची अर्थव्यवस्था सुधारणेच्या दिशेने , कोरोना काळातही जीएसटी संकलन पहिल्यांदाच एक लाख कोटींच्या पुढे 

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दावा केल्यानंतर कोरोना व्हायरसच्या संकंटामध्येही देशाची अर्थव्यवस्था सुधारत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे कडक लॉक डाऊनच्या काळातही व्यापाऱ्यांनी आश्चर्यकारकरित्या वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी भरला असल्याचे अर्थ खात्याचे म्हणणे आहे . शासकीय आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये – 32 हजार 172 कोटी , मेमध्ये – 62 हजार 151 कोटी, जूनमध्ये  – 90 हजार 917 कोटी , जुलैमध्ये  – 87 हजार 422 कोटी, ऑगस्टमध्ये – 86 हजार 449 कोटी,  सप्टेबरमध्ये – 95 हजार 480 कोटी, आणि ऑक्टोबरमध्ये – 1 लाख 5 हजार 155 कोटी  जीएसटीचा भरणा करण्यात आला आहे. दरम्यान कोरोना काळात मागील फेब्रुवारी महिन्यापासून जीएसटी संकलन पहिल्यांदा एक लाख कोटींच्या पुढे  गेले असल्याची माहिती  अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

शासकीय आकडेवारीनुसार ऑक्टोबर 2020 मध्ये 1,05,155 कोटी रुपये सकल जीएसटी (वस्‍तु आणि सेवा कर) महसूल संकलन झाले आहे. ज्यात सीजीएसटी 19,193 कोटी रुपये, एसजीएसटी 25,411 कोटी रुपये, आयजीएसटी 52,540 कोटी रुपये (मालाच्या आयातीवर संकलित 23,375 कोटी रुपयांसह ) आणि उपकर (सेस) 8,011 कोटी रुपये (मालाच्या आयातीवर संकलित 932 कोटी रुपयांसह ) समावेश आहे. ऑक्टोबर महिन्यासाठी 31 ऑक्टोबर , 2020 पर्यंत दाखल करण्यात आलेल्या जीएसटीआर-3बी विवरणपत्रांची एकूण संख्‍या 80 लाख आहे. दरम्यान जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातून ऑक्टोबर 2020 मध्ये 15 हजार 799 कोटींचं जीएसटी संकलन झालं आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये 15 हजार 109 कोटींचं जीएसटी संकलन झालं होतं.

सरकारने नियमित निपटारा स्वरूपात आयजीएसटीमधून सीजीएसटीसाठी 25,091 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 19,427 कोटी रुपये दिले आहेत. ऑक्टोबर 2020 मध्ये नियमित निपटारा केल्यानंतर केन्‍द्र सरकार आणि राज्‍य सरकारे यांनी मिळवलेला एकूण महसूल सीजीएसटीसाठी 44,285 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 44,839 कोटी रुपये आहे. या महिन्यात मिळालेला जीएसटी महसूल गेल्या वर्षी याच कालावधीत मिळालेल्या महसुलाच्या तुलनेत 10 टक्के अधिक आहे. या महिन्यात मालाच्या आयातीतून मिळालेला महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत 9 टक्के अधिक होता आणि देशांतर्गत व्यवहारांमधून (सेवांच्या आयातीसह ) प्राप्त महसूल 11 टक्के अधिक होता. जीएसटी महसुलातील वाढ जुलै , ऑगस्ट आणि सप्टेंबर 2020 च्या तुलनेत अनुक्रमे (-)14, -8 आणि 5 टक्के वाढ नोंदली गेली जी अर्थव्यवस्थेतील सुधारणा आणि महसुलातील वाढ दर्शवते.

 

 

 

 

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!