Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldCoronaUpdate : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने फ्रान्स हादरले , १ डिसेंबर पर्यंत लॉकडाऊनची घोषणा

Spread the love

जगभरात कोरोनाचा कहर चालूच असून कोरोनाची पहिली लाट ओसरत नाही तोच फ्रान्समध्ये दुसऱ्या लाटेचे आव्हान उभे राहिले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून फ्रान्समधील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने सातत्याने वाढ होत असल्यामुळे करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर केला आहे. एक नोव्हेंबरपासून लॉकडाऊन सुरू होणार असल्याची घोषणा फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅन्यूअल मॅक्रॉन यांनी केली.


याबाबत फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी देशाला उद्देशून भाषण केले. यावेळी त्यांनी एक नोव्हेंबर ते एक डिसेंबर दरम्यानच्या लॉकडाऊनची घोषणा त्यांनी केली. फ्रान्समध्ये कोरोनाचा फैलाव अतिशय वेगाने होत असून त्याबाबत कोणीही भविष्य वर्तवू शकत नाही. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पॅरिस आणि इतर मोठ्या शहरांमध्ये काही निर्बंध लागू करण्यात आले. मात्र, कोरोनाची दुसरी लाट रोखण्यास अपयश आले असल्याचे त्यांनी सांगितले. फ्रान्समध्ये करोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या ३५ हजारांहून अधिक झाली आहे. इतर युरोपीयन देशांपेक्षा फ्रान्समध्ये दुसरी लाट अधिक मोठी आणि प्रभावी असून पहिल्या लाटेपेक्षाही अधिक नुकसान दुसऱ्या लाटेमुळे होण्याची भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली. योग्य वेळीच उपाययोजना न आखल्यास मृतांची संख्या ४० हजारांहून अधिक होणार असल्याचीही शक्यता मॅक्रॉन यांनी व्यक्त केली.

फ्रान्समध्ये सध्या रुग्णालयात तीन हजार करोनाबाधितांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत ही संख्या ९००० होण्याची भीती असून त्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही मॅक्रॉन यांनी सांगितले. लोकांनी घरीच थांबावे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. फ्रान्सच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी २४४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३६ हजार नागरिकांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. फ्रान्समध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला असला तरी अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. कारखाने, शेती उद्योग सुरूच राहणार आहेत. त्याशिवाय लॉकडाउनमुळे होणारे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी सार्वजनिक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. त्याशिवाय ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

देशात लॉकडाऊनची परिस्थिती असली तरी कोणत्याही परिस्थिती अर्थव्यवस्था थांबता अथवा कोसळता कामा नये असेही मॅक्रॉन यांनी म्हटले. व्यवसाय, उद्योगांना आर्थिक दिलासा देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. दोन आठवड्यात परिस्थिती सुधारल्यास लॉकडाउनबाबत फेरआढावा घेण्यात येणार असून सर्वकाही ठिक असल्यास आणखी काही व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात येईल. त्याशिवाय, नाताळ आणि नवीन वर्ष उत्साहात साजरे करू असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!