BiharElectionUpdate : पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला , उद्या ७१ जागांसाठी मतदान , नितीशकुमारांच्या सभेत भिरकावली चप्पल , विरोधातील घोषणांनी गाजल्या सभा

Spread the love

अखेर बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची  रणधुमाळी काल संपली असून पहिल्या टप्प्यात ७१ जागांसाठी उद्या  २८ ऑक्टोबर रोजी  मतदान होत आहे. दरम्यान दरम्यानच्या काळात आपल्या प्रचार सभांमधून विरोधकांनी विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.  याशिवाय अनेक जागांवर बंडखोर उमेद्वारांनीही  सत्ताधाऱ्यांसाठी आव्हान उभे केले आहे. त्यामुळे बिहारच्या निवडणुकीत यावेळी मोठी चुरस निर्माण झाली आहे.  कहर म्हणजे आज प्रचार समाप्तीच्या दिवशी बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये प्रचारसभेनंतर व्यासपीठावरून मुख्यमंत्री नितीशकुमार उतरताच काही तरुणांनी ‘नितीशकुमार मुर्दाबाद’ अशी नारेबाजी केली. त्यावेळी  गर्दीतील एकाने नितीशकुमार यांच्यादिशेने चप्पलही  भिरकावल्याने पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं आहे.


दरम्यान मुजफ्फरपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची सभा झाली होती. यासभेतही नितीशकुमार मुर्दाबाद, अशी नारेबाजी केली गेली. यावेळी नितीशकुमार यांनी नारेबाजी करणाऱ्यांना सुनावलं. जो जिंदाबाद आहे, त्याची सभा ऐकण्यासाठी जा, असं नितीशकुमार म्हणाले. बिहारमध्ये आपली पुन्हा सत्ता आल्यास राज्यात २४ तास वीजपुरवठा होईल. प्रत्येक घरात सौर पथदिवे असतील. स्वच्छतेबरोबरच तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणाचीही व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन देत  नितीशकुमार  , गेल्या १५ वर्षात राज्यात किती वेगवान विकास झाला आहे हे सांगण्याचा प्रयत्न करीत असताना हा प्रकार घडला. रविवारीही मुजफ्फरपूरमध्ये नितीशकुमारांच्या प्रचारसभेत  काही तरुणांनी घोषणाबाजी सुरू केल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. या तरुणांनी सभेच्या मध्यभागी बसून नितीशकुमार यांच्याविरोधात मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना सभेतून बाहेर काढले.

पहिल्या टप्प्यात ८ मंत्र्यांची सत्वपरीक्षा

आज पहिल्या टप्प्यातील मतदानात  मुख्यमंत्री नितीशकुमारयांच्या मंत्रिमंडळातील ८ मंत्र्यांच्या विश्वासार्हतेसह अनेक राजकीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यापैकी ४ भाजप आणि जेडीयू कोट्यातील ४ मंत्री आहेत.  बिहारमधील नितीशकुमार सरकारमधील ज्या ८ मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्यात गयाचे कृषिमंत्री डॉ. प्रेम कुमार, जहानाबादचे शिक्षणमंत्री कृष्णा नंदन वर्मा, जमालपूरचे ग्रामविकास मंत्री शैलेश कुमार, राजापूरचे दीनारा येथील विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जय कुमार सिंह यांचा समावेश आहे. परिवहन मंत्री संतोषकुमार निराला, बांका येथील महसूलमंत्री रामनारायण मंडळ, लखीसराय येथील कामगारमंत्री विजय कुमार सिन्हा आणि चैनपूरचे एससी व एसटी कल्याण मंत्री ब्रिजकिशोर बिंद यांचा समावेश आहे.

प्रचारातील मुद्दे

बिहार विधानसभा निवडणुकीत जेडीयू-भाजप युतीला राष्ट्रीय जनता दलाच्या आघाडीचे मोठे आव्हान आहे. या निवडणुकीत  आरजेडीचे नेते तेजस्वी यादव  हे सतत महागाई, बेरोजगारी आणि बिकट अर्थव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत आहेत. देशात कांद्याचे दर प्रति किलो १०० रुपयांपर्यंत गेले आहेत. बर्‍याच शहरांमध्ये कांद्याचे दर प्रतिकिलो १४० ते १५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. यावरून सोमवारी तेजस्वी यादव यांनी केंद्र सरकारवर हल्ला केला. भाजपवरही त्यांनी टीका केली. बेरोजगारी आहे, उपासमारी वाढत आहे. छोटे व्यापारी नष्ट होत आहेत. दारिद्र्य वाढत आहे. जीडीपी कमी होत आहे. आपण आर्थिक संकटातून जात आहोत, अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली. तर काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी अनेक मुद्यांवरून भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तुफान हल्ला चढवत मोदी जातील तेथे खोटे बोलतात अशी टीका केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा चीन , काश्मीर  हे मुद्दे उपस्थित करीत. कोरोना लस , केंद्राचे काम , बिहारचा विकास या मुद्द्यावर आपल्या भाषणात भर दिला. पहिल्या टप्प्यातील प्रचारात तेजस्वी यादव यांच्या सभांना मिळणार प्रतिसाद अभूतपूर्व असल्याचे दिसत आहे.

आपलं सरकार

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.