Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : किती नाकारले ,  धिक्कारले , तो जवळ येऊच नये म्हणून अनेकांना दूर लोटले पण त्यांने घेरलेच… !!

Spread the love

किती नाकारले ,  धिक्कारले , तो जवळ येऊच नये म्हणून अनेकांना दूर लोटले पण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना अखेर कोरोनाने गाठलेच. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांनी पहिल्यांदा कोरोना चाचणी केली तेंव्हा नकारत्मक आली त्यामुळे ” अजित दादांना कोरोना नाहीच..” असे पार्थ पवार आणि त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले होते . मात्र त्यांना दुसऱ्यांदा केलेल्या चाचणीत कोरोनाने घेतल्याचे आढळून आले असून त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्ड रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अजित पवार यांनीच स्वतः ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे.

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि , “आपली प्रकृती उत्तम असून विश्रांतीनंतर लवकरच आपल्यासोबत असेन”. थकवा जाणवत असल्याने अजित पवार गेल्या चार दिवसांपासून होम क्वॉरन्टाईंन होते. यानंतर आज सकाळी ते ब्रीच कॅण्ड रुग्णालयात दाखल झाले. “माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याशा विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन, असं अजित पवार यांच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

दरम्यान “अजित पवार यांना खोकला होता, त्यामुळे कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यांची प्रकृती नॉर्मल आहे, फक्त विश्रांतीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पाच-सात दिवसांच्या विश्रांतीनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल,” अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. तसंच त्यांच्या कुटुंबातील सगळ्यांची चाचणी केली असून ते सर्व जण निगेटिव्ह आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

करोनाच्या काळातही अजित पवार यांचा कामाचा धडाका सुरू होता. लॉकडाऊनच्या काळात मंत्रालयात त्यांची नियमित उपस्थिती असायची. ते बैठका घेत होते. मात्र, करोनाच्या अनुषंगाने ते सर्व प्रकारची काळजी घेत होते. अलीकडेच त्यांनी अतिवृष्टग्रस्त भागांचा दौरा केला होता. तो दौरा करून परतल्यानंतर त्यांना थकवा जाणवत होता. त्यानंतर खबरदारी म्हणून त्यांनी घरीच विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी शासकीय बैठका व पक्षपातळीवरील कार्यक्रमही रद्द केले होते. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश सोहळ्यालाही त्यांना उपस्थित राहता आलं नव्हतं. ‘देवगिरी’ निवासस्थानातूनच ते दैनंदिन शासकीय कामकाज करत होते. आपल्या प्रत्येक दौऱ्यात ते कोणालाही आपल्या  जवळ येऊ देत नव्हते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!