Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : अखेर भाजपनेते एकनाथ खडसे झाले राष्ट्रवादी , भाजपला सुनावले खडे बोल

Spread the love

भाजपाला सोडचिट्ठी दिल्यानंतर अखेर आज एकनाथ खडसे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशासाठी एकनाथ खडसे गुरुवारीच हेलिकॉप्टरने मुंबईत दाखल झाले होते . त्यांच्यासोबत त्यांची मुलगी रोहिणी खडसे यादेखील आहेत. रोहिणी खडसे यांनीही आपण भाजपामधून बाहेर पडणार असल्याचं जाहीर केलं असून राष्ट्रवादीसाठी काम करणार असल्याचं सांगितलं आहे. एकनाथ खडसेंसोबत जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्य़ांतील त्यांचे समर्थकही पक्षात प्रवेश करणार आहेत, असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. तसंच खडसे यांच्या पुनर्वसनाबाबत कोणी चिंता करू नये असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

यावेळी बोलताना खडसे म्हणाले कि , मी गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारण करतो आहे. मात्र कधीही कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. तोंडावर गोड बोलायचं, तुम्ही ज्येष्ठ म्हणायचं आणि मागून खंजीर खुपसायचा हे मी कधीही केलं नाही.  ४० वर्षे मी भाजपाची सेवा केली, त्याबदल्यात मला काय दिलं पक्षाने? माझ्यावर झालेल्या अन्यायाचं उत्तर भाजपाचे लोक देऊ शकले नाही. मी पक्ष सोडावा अशी कार्यकर्त्यांची भावना होती. तोंडावर गोड बोलायचं आणि पाठीमागे कारवाया करत रहायचं हे मी कधी केलं नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी टोला लगावला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यानंतर त्यांनी हा आरोप केला आहे.

एकनाथ खडसे पुढे म्हणाले कि , मी राष्ट्रवादीत जाणार तर बोंबाबोंब झाली. मग तुम्ही सकाळी पाच वाजता शपथ घेतली तेव्हा तुम्हाला राष्ट्रवादी पक्षच चांगला वाटला ना? पहाटे पाचला जसा तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगला वाटला होता त्यापेक्षा मला राष्ट्रवादी पक्ष चांगला वाटतो आहे ना.. म्हणून मी आलो राष्ट्रवादीत असं म्हणत पहाटेच्या शपथविधीवरही खडसेंनी टीका केली. आज राष्ट्रवादीत आल्याने मला माझ्या डोक्यावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं आहे असंही खडसे यांनी म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!