Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : पंजाब , बिहार पाठोपाठ पश्चिम बंगालमध्येही मित्र पक्षाने सोडली भाजपची साथ

Spread the love

पश्चिम बंगालमधील भाजपाचा सहकारी पक्ष गोरखा जनमुक्ती मोर्चानं ‘एनडीए’तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षापासून फरार असलेले जीजेएमचे अध्यक्ष बिमल गुरूंग यांनी आज ही घोषणा केली. बंगालमध्ये होणाऱ्या आगामी निवडणूक जीजेएम मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेससोबत लढणार आहे. पंजाबमध्ये  शिरोमणी अकाली दल, बिहारमध्ये लोजपा पाठोपाठ भाजपाला आता पश्चिम बंगालमध्ये गोरखा जनमुक्ती मोर्चानंही झटका दिला आहे. दरम्यान महाराष्ट्रातही भाजपने शिवसेनेला या पूर्वीच गमावले आहे.

गोरखा मुक्ती मोर्चाने २०१७ मध्ये एका पोलिसाची हत्या केली होती तेव्हापासून गुरुंग हे भूमिगत झाले होतो. आज अचानक कोलकत्यात यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. कोलकता पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध लुक आऊट नोटीस बजावली होती. हा निर्णय जाहीर करताना पक्षाचे प्रमुख बिमल गुरूंग म्हणाले,”भाजपानं जी आश्वासन दिली होती, ती पूर्ण केली नाहीत. पण ममता बॅनर्जी यांनी जी आश्वासनं दिली होती, ती पूर्ण केली आहे. त्यामुळे मी एनडीएपासून दूर होऊ इच्छित आहे. मी भाजपाशी असलेले संबंध तोडत आहे,” असं सांगत गुरूंग यांनी भाजपासह एनडीएतून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका जवळ येत असतानाच भाजपाला हा धक्का बसला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना गुरुंग म्हणाले कि , २०२१ मध्ये होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत गोरखा जनमुक्ती मोर्चा तृणमूल काँग्रेससोबत निवडणूक लढवणार असून, त्यातून भाजपा ठोस प्रत्युत्तर देऊ. मला इतकंच सांगायचं आहे की, गोरखालँडची आमची मागणी अजूनही कायम आहे. आम्ही ही मागणी यापुढेही लावून धरू. हे आमचं ध्येय आहे. आमचं उद्दिष्ट आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत ही मागणी स्वीकारणाऱ्या पक्षाला आम्ही पाठिंबा देऊ.  बिमल गुरूंग यांच्या एनडीएतून बाहेर पडण्याच्या निर्णयाचा भाजपाला फटका बसू शकतो. पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील पहाडी भागात कमीत कमी १० जागांवर भाजपाला फटका बसू शकतो. तिथल्या भाजपाच्या व्होट बँकेवर गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो, असं बोललं जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!