Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalNewsUpdate : अखेर खडसे यांचे ठरले , शुक्रवारी करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Spread the love

अखेर भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून  ते शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत आज ही घोषणा केली. ‘खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. त्यांनी फोन करून मला ही माहिती दिली. शुक्रवारी दुपारी २ वाजता आपल्या समर्थकांसह खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांना पक्षात काय मिळणार हे आत्ताच सांगता येणार नाही. त्यांच्यासारखा नेता आमच्या पक्षात येतोय ही आनंदाची बाब आहे. राज्यात भाजपचा विस्तार करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मात्र, पक्षात त्यांच्यावर अन्याय झाला. त्यामुळंच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीमध्ये आम्ही त्यांचे स्वागत करतो,’ असंही पाटील म्हणाले.

भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपला सोडण्याची अनेक आमदारांची इच्छा आहे. मात्र, त्यांनी पक्षांतर केल्यास पोटनिवडणुका घ्याव्या लागतील. करोनाच्या संकटाच्या काळात निवडणुका घेणं परवडणार नाही. मात्र, त्यांना मानणारे आमदार कालांतराने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोटही जयंत पाटील यांनी केला.

दरम्यान ‘एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देणं ही बातमी धक्कादायक आहे. भाजपसाठी ही चिंतनाची बाब आहे,’ असं परखड मत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं आहे. ‘मी खडसेंच्या नेतृत्वाखाली काम केलं असल्यानं त्यांनी पक्ष सोडून जाऊ नये असं मला वाटत होतं. आता ते गेले असले तरी शक्य झाल्यास त्यांनी निर्णय बदलावा व परत यावं, असं म्हणत, ‘वो जानेवाले हो सके तो लौट के आना’ अशी सादही मुनगंटीवार यांनी घातली. ‘अर्थात, लोकशाहीमध्ये निर्णयाचा अधिकार सर्वांना असतो. तो त्यांनी घेतला. एक चांगला नेता, ज्यांनी संघटनेवर प्रेम केलं, पक्ष वाढवला. ते एखाद्या नाराजीतून जात असतील तर आमच्यासाठी चिंतनाची बाब आहे,’ असं ते म्हणाले. ‘पंधरा दिवसांपूर्वी माझं त्यांच्याशी बोलणं झालं, तेव्हा ते इतके नाराज आहे असं जाणवलं नव्हतं. पक्षात अन्याय होतोय असं जे त्यांना वाटत होतं, त्यावर चर्चेतून मार्ग काढता आला असता. पण ठीक आहे. खूश रहो तुम सदा ये दुवा है हमारी… एवढंच आता म्हणून शकतो,’ असं मुनगंटीवार म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!