Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalNewsUpdate : …म्हणून मी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला , खडसे यांनी जाहीर केली आपली भूमिका

Spread the love

फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्यामुळेच आपण पक्षातून बाहेर पडत असल्याची घोषणा एकनाथ खडसे यांनी अधिकृतपणे केली . हि घोषणा करताना त्यांचा गळा भरून आला होता.  गेल्या ४० वर्षांपासून ते भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नेते होते. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर आज एकनाथ खडसे यांनी या चर्चेला पूर्णविराम देत राष्ट्रवादीत जाण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.

शिवसेना आणि भाजप युती तोडण्याची माझी भूमिका नव्हती

आपली भूमिका जाहीर करताना खडसे म्हणाले कि , माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंजली दमानिया यांनी माझ्यावर खोटे आरोप केले होते. त्यांनी सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रात्रभर गोंधळ घातला होता. त्यानंतर त्यांनी फडणवीस यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, पोलीस सुद्धा गुन्हा दाखल करण्यासाठी तयार नव्हते. त्यावेळी स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना फोन करून  गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते. दरम्यान खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मी फडणवीस यांच्याशी बोललो तेव्हा, नाईलाजाने तक्रार दाखल करावी लागली, असं उत्तर फडणवीस यांनी दिले. ते तपास करून तक्रार दाखल करा, असं सांगू शकत होते. पण, अत्यंत खालच्या स्तराचे राजकारण करण्यात आले, अशी टीकाही खडसेंनी केली.

‘भारतीय जनता पक्षाचे ४० वर्षांपासून काम पाहत आलो. जेव्हा भाजप खेड्यापाड्यात पोहोचली नव्हती. तेव्हापासून गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासह अनेक नेत्यांसोबत काम करत आलो. आतापर्यंत पक्षात काम करत असताना मला अनेक पदं मिळाली हे मी नाकारत नाही. मी कुठल्याही नेत्यावर टीका केली नाही.  मी जेव्हा मुख्यमंत्रिपदाचा दावा केला होता, त्यानंतर माझ्यावर अनेक आरोप झाले. अनेक वेळा चौकशी झाल्या’ असं खडसे यांनी सांगितले. त्याचबरोबर शिवसेना आणि भाजप युती तोडण्याची माझी भूमिका नव्हती. युती तोडण्याचा निर्णय हा सर्वांनी मिळून घेतला होता. विरोधी पक्ष नेता असल्यामुळे मला फक्त घोषणा करावी लागली होती, असंही खडसेंनी सांगितलं.

रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया

भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेव दानवे यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले कि , भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतल्याने भाजपला धक्का बसला आहे. राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय हा त्यांच्या स्वत:साठीच अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी भाजप सोडायला नको होते. ज्या पक्षाने त्यांच्यावर टीका केली, भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच पक्षात ते गेले, हे सगळं टाळता आलं असतं असेही ते म्हणाले.

खासदार रक्षा खडसे म्हणतात मी भाजपमध्येच राहील

दरम्यान एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाल्यानंतर त्यांच्या स्नुषा आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे या कुठला निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. रक्षा खडसेही भाजप सोडतील अशीही चर्चा होती. मात्र त्यांनी या सगळ्या चर्चेला पूर्णविराम देत भाजपमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट केलं. त्या म्हणाल्या, मी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देणार नाही. मी पक्षाची कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहील असं त्यांनी स्पष्ट केलं. त्या पुढे म्हणाल्या, पक्षाने जी जबाबदारी दिली होती ती मी पूर्ण करेल. एकनाथ खडसे यांना आलेल्या अनुभवाच्या आधारावरती त्यांनी राजीनामा दिला. पण नाथाभाऊंचा माझ्यावरती कुठलाही दबाव नाही, असं मत खासदार रक्षा खडसे यांनी ‘न्यूज18 लोकमत’शी बोलताना व्यक्त केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!