MaharashtraNewsUpdate : पुढील तीन दिवसात मदतीचा निर्णय जाहीर करू , मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांपासून अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत . आज त्यांनी उस्मानाबादमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले कि , अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करु. येत्या दोन ते तीन दिवसांत मंत्रीमंडळ बैठक घेऊन मदतीचा निर्णय घेतला जाईल. सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करणाऱ्यातला मी नाही. जे बोलतो ते मी करतो, पण करू शकत नाही असं बोलत नाही. तुम्ही सर्वजण मला ओळखता. तुम्हाला बरं वाटावं, टाळ्या वाजवाव्यात यासाठी आकडा जाहीर करणार नाही. मी दिलासा देण्यासाठी आलो आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले कि , आजची परिस्थिती भयानक आहे. आपण संकटाता सामना केला नाही असं काही नाही. वर्षाची सुरुवातच जागतिक संकटाने झाली आहे. बाहेर पडू म्हणताच निसर्ग वादळ आलं आणि जाता जाता पावसाने तडाखा दिला. महाराष्ट्र मला नवीन नाही. यापूर्वी जेव्हा आलो तेव्हा मुख्यमंत्री नव्हतो. तुमच्या वेदना, व्यथांना आवाज देण्याचं काम मी तेव्हा करत होतो. माझं कर्तृत्व शून्य आहे, पण तुमच्या आशिर्वादामुळे मुख्यमंत्री झालो आहे.
शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. पुढील दोन दिवसांत मंत्रीमंडळ बैठक होईल. जवळपास ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. लवकरात लवकर आयुष्य पुन्हा उभं करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार वचनबद्ध आहे. आकडे लावण्यासाठी मी आलेलो नाही. जे करु तुमच्या सुखासाठी करु. धीर सोडू नका, खचून जाऊ नका, आपण बाहेरुनच तुळजाभवानी देवीचं दर्शन घेणार असून माते , लवकर संकट दूर कर अशी प्रार्थना आपण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. “आम्ही परिस्थितीचा अंदाज घेत आहोत. अतिवृष्टी होण्याच धोका कमी झाला आहे. पण पुढील सात ते आठ दिवस वातावरण बिघडू शकतं असं हवामान विभागाने सांगितलं आहे.