Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Politics of Maharashtra : मुख्यमंत्र्यांनी केलेली टीका देवेंद्र फडणवीस यांना चांगलीच झोंबली , म्हणाले , थिल्लरपणा सोडा, मोदी साहेबांशी तुलना करू नका…

Spread the love

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  केलेली टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चांगलीच झोंबली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी  पलटवार केल्यानंतर पुन्हा एकदा फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवेदनशील परिस्थितीत अतिशय थिल्लरपणा करत आहेत’, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना फटकारले आहे. ‘इतक्या दिवसांतून आज दोन-तीन तासांसाठी बाहेर आला आहात तर लगेचच स्वतःची तुलना मोदी साहेबांशी करू नका’, असा टोलाही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. सरकार चालवायला दम लागतो, असे नमूद करताना केंद्राने कोणतेही पैसे थकवले नसून राज्याचा जीएसटी कमी जमा झाल्याने त्याची भरपाई केंद्र सरकार करून देत आहे, असा खुलासाही फडणवीस यांनी केला.

अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी फडणवीस आज माढा आणि करमाळा दौऱ्यावर आले होते. तिथे नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानांकडे फडणवीसांचे लक्ष वेधले असता फडणवीस यांनी त्याला उत्तर दिले. केंद्र सरकारने नेहमीच महाराष्ट्राला मदत केली आहे. आता लोकांना तातडीने मदतीची गरज आहे अशावेळी केंद्राकडे मदतीसाठी बोट दाखवण्याऐवजी हिम्मत असेल राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, असे आव्हान फडणवीस यांनी दिले. केंद्र सरकारने कर्ज काढून राज्याच्या जीएसटीचे पैसे दिले आहेत असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला.

मला अर्थशास्त्र चांगले कळते असे सांगताना राज्याने ५० हजार कोटी कर्ज घेतले आहे. आणखी ७० हजार कोटी रुपये कर्ज काढण्याची राज्याकडे क्षमता आहे. कर्ज काढा पण शेतकऱ्यांना मदत करा. आम्ही शेतकऱ्यांना केंद्राच्या मदतीची वाट न बघता १० हजार कोटी रुपये मदत केली होती, अशी आठवणही फडणवीस यांनी अजित पवार यांना करून दिली. पूर परिस्थितीमध्ये राजकारण न करता सर्वांनी एकत्र येत केंद्राकडे मदत मागितली पाहिजे. उगाच राजकारणाचा चिखल उडवू नये, असा सल्ला मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना दिला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!