MaharashtraNewsUpdate : मराठवाड्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान , शरद पवार यांचा दोन दिवसीय दौरा

राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये भुईमूग, सोयाबीन आणि भाताच्या पिकांचा समावेश आहे. या नुकसानीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मराठवाड्यासाठी दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार १८ ते १९ ऑक्टोबर या दोन दिवसांत मराठवाड्यातील तुळजापूर, उमरगा, औसा, परंडा, उस्मानाबादमधील भागांना भेट देणार असून नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. तर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आजपासून बारामती तालुक्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे पुणे विभागातील पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये प्रचंड प्रमाणात हानी झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत पुणे, कोकण, औरंगाबाद आणि नाशिक येथील विभागीय आयुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली व जिल्ह्यातील सद्यस्थितीता आढावा घेतला असून तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना केली आहे. राज्याच्या काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतीचं मोठे नुकसान झालं आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीची झालेली व्याप्ती पाहता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून मदतीचे आश्वासन दिले आहे तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारने राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी केली आहे.