Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : मुंबईत यायचंय तर आता बिनधास्त या , ना क्वारंटाईनची भीती ना हातावर शिक्का … !!

Spread the love

राज्य सरकारने आता मुंबईत बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना  विलगीकरणाची (क्वारंटाईन) तसेच हातावर शिक्का मारण्याची सुद्धा गरज नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता हवाई मार्गाने , रेल्वेने किंवा कोणत्याही मार्गाने मुंबईत येणारे प्रवासी बिनधास्त येऊ शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान विलगीकरणाची गरज नसली तरी प्रत्येकाने कोरोना सुरक्षेसंबंधीचा शिष्टाचार पाळणे मात्र बंधनकारक असेल, असे नमूद करण्यात आले आहे. यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशांतर्गत कुठल्याही शहरातून दाखल होणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने राज्यातील सर्व शहरांमधील रेल्वे स्टेशन व विमानतळांसाठीही हा निर्णय घेतला आहे.

सरकारकडून राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरू असून  मिशन बिगिन अंतर्गत राज्य सरकार अनेक निर्बंध शिथील करत आहे. त्याचा भाग म्हणून विमान, रेल्वे आणि रस्तेमार्गे येणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. आधीच्या नियमानुसार मुंबईत विमानाने येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस होम क्वारंटाईन राहणे बंधनकारक होते. या क्वारंटाईनच्या अटीमुळे प्रवाशांची मोठी कोंडी होत होती. आता क्वारंटाईनची अट शिथील करण्यात आल्याने सर्वच प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, राज्य सरकारने अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात सर्वप्रथम हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी दिली. ५० टक्के क्षमतेने मार्गदर्शक तत्वे पाळून ग्राहकसेवा द्यावी, असे सरकारने स्पष्ट केले. त्यानंतर बुधवारी सरकारने आणखी काही निर्णय घेतले. त्यात मुंबई मेट्रो आणि मोनो रेलसेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला. यापैकी मोनो रेल रविवार दि. १८ ऑक्टोबरपासून धावणार आहे तर मेट्रो सेवा सोमवार दि. १९ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातील सर्व खासगी आणि शासकीय ग्रंथालये सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. राज्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात सर्वच शहरांत आठवडे बाजार भरतात. या बाजारांनाही अनुमती देण्यात आली आहे. त्यासोबत जनावरांच्या बाजारांनाही परवानगी मिळाली आहे. या निर्णयांनंतर आता विमान आणि रेल्वे प्रवाशांची क्वारंटाईनमधून सुटका करण्यात आल्याने  मुंबईत येणाऱ्या प्रवाश्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!