Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : मुंबईच्या विजेला नेमकं झालं काय ? मुख्यमंत्र्यांची बैठक , ऊर्जामंत्र्यांनी केला “हा” खुलासा

Spread the love

मुंबईकर  वीज आणि लोकल यांचं नातं  अतूट आहे . आधीच लोकल सेवा पुरवत न झाल्याने त्रस्त असलेल्या मुंबईकरांची वीज अचानक गुल झाल्याने  संताप व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी अचानक वीज पुरवठा बंद झाल्यानं मुंबईकरांचा तब्बत दोन ते अडीच तास खोळंबा झाला . विद्युत कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करत काही भागांतील वीज पुन्हा पुर्ववत केली आहे. मात्र, अद्यापही काही भागांत वीज पुरवठा सुरळीत झालेली नाही. संध्याकाळपर्यंत सर्व वीज पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता महापारेषणकडून वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक घेत आहेत. या बाबत  ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन , मुंबईत खंडित झालेल्या वीजपुरवठा  पुर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत असल्याची माहिती  दिली आहे. वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर ज्या कारणांमुळं तांत्रिक बिघाड झाला आहे त्याची चौकशी करण्यात येईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. तसंच, मुंबईतील ३० ते ४० टक्के भागांत वीज सुरळीत झाली आहे. काही भागांतही वीज पुन्हा पुर्ववत होईल, असंही ते म्हणाले आहेत.

याचे स्पष्टीकरण देताना सांगण्यात येत आहे कि , महापारेषणच्या ४०० के. व्ही. कळवा-पडघा GIS केंद्रात सर्किट-१ ची देखभाल दुरूस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट-२ वर होता. मात्र, सर्किट-२ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील काही भागात वीजपुरवठा खंडित झाला. मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा, पडघा, खारघर ट्रान्सफॉर्मर वाहिनी बंद झाल्या. मुंबई व मुंबई उपनगरचा २२०० मेगावॅट वीजपुरवठा खंडित झाला. उरण वायू विद्युत केंद्रातील सर्व संच एससी बिघाड झाल्याने बंद झाला. खारघर-तळोजा वाहिनी बंद झाली. दरम्यान, महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने ती वाहिनी पूर्ववत केली आहे. दरम्यान, कळवा-खारघर येथील जंपर ब्रेकडाऊन झाला असून तो दुपारी अडीच वाजता सुरू करण्यात आला आहे, असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

मुख्यमंत्र्यांची बैठक आणि ऊर्जा मंत्र्यांचा खुलासा

दरम्यान मुंबई महानगर प्रदेशात वीज पुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्याने जी अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली त्याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी  या विषयावर तातडीची उच्चस्तरिय बैठक घेऊन चर्चा सुरु केली आहे . या बैठकीत संपूर्ण स्थितीचा आढावा घेऊन पुढील पाऊल उचलले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे . मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा खंडित झाल्याच्या घटनेची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी पावले उचलायला सुरुवात केली आहे. ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी चर्चा करतानाच मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानंतर आता जवळपास सर्वच भागांत वीज पुरवठा सुरळीत झाला असून आता हा प्रकार नेमका घडला कशामुळे?, याचा छडा लावण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री ठाकरे यांनी तातडीने उच्चस्तरिय बैठक बोलावली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला मुंबईतील अभूतपर्व अशा वीज गोंधळावरून  जाब विचारला आहे. करोनाचं संकट असताना अशा प्रकारे वीज पुरवठा खंडित होणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. सामान्य मुंबईकरांना अचानक धक्का देणारी आणि मुंबईला ठप्प करणारी ही घटना कुणामुळे घडली याचा शोध तातडीने घ्यायला हवा. ट्रेन, हॉस्पिटल, पाणीपुरवठा अशा सगळ्यालाच मोठा फटका बसला. त्यामुळे याची चौकशी होईल व जो कुणी दोषी असेल त्याच्यावर ठोस कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी या संपूर्ण घटनेवर चिंता व्यक्त केली.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!