Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathwadaNewsUpdate : नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या , चिट्ठीत केला मराठा आरक्षणाचा उल्लेख…

Spread the love

नुकत्याच झालेल्या  नीट परीक्षेचा पेपर अवघड गेल्याने निराश झालेल्या मुलाने  आत्महत्या केल्याची  हृदयद्रावक घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. विवेक कल्याण रहाडे  असे या १८ वर्षीय  मुलाचे नाव आहे. शेतकरी कुटुंबातील विवेक बारावीमध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाला होता. त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. वैद्यकीय प्रवेशासाठी त्याने १५ दिवसांपूर्वी नीट परीक्षा दिली होती. या परीक्षेसाठी त्याने चांगली तयारी केली होती. पण पेपर कठीण गेल्याने या परीक्षेत चांगले गुण मिळतील की नाही? याची चिंता त्याला सतावत होती. या तणावातून त्याने आज दुपारी स्वत:च्या शेतात जाऊन लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आकस्मिक मृत्यूची नोंद बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली.

विवेकने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली असून मृत्युपूर्वी त्याने तशा आशयाची चिट्ठी लिहून ठेवल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. “मी कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा असून जीवनात खूप मोठे होण्याची इच्छा आहे. परंतु मराठा आरक्षण गेल्यामुळे माझा नीट परीक्षेत नंबर लागत नाही. मला खाजगी महाविद्यालयात शिकवण्याची माझ्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती नाही, त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे. माझ्या मृत्यूनंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना मराठ्याच्या मुलाची किव येईल आणि माझे मरण सार्थकी लागेल” असे विवेकने त्या कथित चिट्ठीत लिहिल्याचे सांगितले जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!