Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा : आ. अनिल भोसले यांच्या मालमत्तेवर टांच

Spread the love

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणात अडकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया पुणे पोलिसांनी सुरु केली असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी चार दिवसांपूर्वी अनिल भोसले यांच्या मालकीच्या चार अलिशान गाड्या जप्त केल्या. त्याचबरोबर अनिल भोसलेंच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या मालमत्तांची माहिती मिळवण्याचे कामही पोलिसांकडून सुरु असून आतापर्यंत अनिल भोसलेंच्या मालकीच्या ३० कोटी रकमेच्या मालमत्तेची माहिती पोलिसांनी मिळवली असल्याचे सांगण्यात येत आहे. ही मालमत्ता महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्याअंतर्गत जप्त करून त्याची विक्री करून त्यातून उभी राहणारी रक्कम ठेवीदारांना देता येईल का याचा पोलीस विचार  करीत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी यांनी दिली आहे. पुणे पोलीस याबाबत राज्य सरकारच्या संपर्कात आहेत .

राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले हे शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे संचालक असताना बंँकेतील रक्कम खातेदारांची बनावट नावं तयार करून अनिल भोसलेंनी स्वतः वापरल्याचा आरोप आहे. त्यामुळे संचालक म्हणून काम करताना ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केलेल्या लेखापरीक्षणात बँकेत ७२ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले होते.  या प्रकरणाचा पोलीस तपास सुरु झाल्यानंतर आणखी ८१ कोटी रुपयांची रक्कम अवैधरित्या काढण्यात आल्याचेही निदर्शनास आले होते. आतापर्यंत या प्रकरणात१५३ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे  उघड झाले असून आणि या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढू शकते असे चौकशी अधिकाऱ्यांचे मत आहे.  या घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी अनिल भोसले आणि त्यांच्यासोबत घोटाळ्यात सहभागी असलेल्या बँकेतील अधिकाऱ्यांना अटक केली होती. तेव्हापासून अनिल भोसले हे येरवडा कारागृहात आहेत. आतापर्यंत या प्रकरणात ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये अनिल भोसले यांच्या पत्नी आणि भाजपच्या नगरसेविका रेश्मा भोसले यांचाही समावेश आहे.

या बँकेत पैसे ठेवणाऱ्या ठेवीदारांमध्ये सोळा हजार ठेवीदारांमध्ये निवृत्त सैनिक, ज्येष्ठ नागरिक आणि हातावर पोट असलेल्या कामगारांचा प्रामुख्याने समावेश आहे. २०१६ पासून बँकेत गैरव्यवहार असल्याचा आरोप होत होता. माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख हे अनिल भोसले यांचे व्याही असल्याने भोसलेंवर कारवाई होत नसल्याचा आरोप ठेवीदारांकडून होत होता. त्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत अनिल भोसले आणि अजित पवारांमध्ये रेश्मा भोसले यांना तिकीट देण्यावरून मोठा वादही झाला होता. एप्रिल २०१९ मध्ये रिझर्व्ह बँकेने शिवाजीराव भोसले बँकेच संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासक नेमण्याचा आदेश दिला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!