Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraNewsUpdate : पैसा झाला मोठा …. अडीच लाख भरूनही एक लाखाचे शिल्लक बिल घेतल्याशिवाय मृतदेह ताब्यात देण्यास रुग्णालयाचा नकार….

Spread the love

जळगाव शहरातील कोविड डेडिकेटेड गणपती रुग्णालयात पैसा आणि  व्यवहार मोठा झाल्याने कोविडमुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेतानाही मृताच्या कुटुंबियांना बिलासाठी अडवण्यात आल्याची घटना घडली आहे. रुग्णालय प्रशासनाने मृताच्या कुटुंबियांच्या हातात ४ लाख ११ हजाराचे बिल दिले .  विशेष म्हणजे या कुटुंबीयांनी रुग्णालयात ऑनलाइन २ लाख ४४ हजार तसेच ५० हजार रुपये रोख भरले त्यावर आणखी १ लाख ११ हजार रुपये कसे द्यावेत ? असा प्रश्न उपस्थित केला तेंव्हा आधी पैसे द्या आणि मृतदेह घेऊन जा  अशी भूमिका रुग्णालयाने घेतली . मयत रुग्णावर या रुग्णालयात चौदा दिवसांपासून उपचार चालू होते त्यातच गुरुवारी सायंकाळी या रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या आडमुठेपणाबद्दल मृताच्या नातेवाईकांनी आज शुक्रवारी सकाळी रुग्णालयात संताप व्यक्त केल्याने गोंधळ निर्माण झाला. अखेर शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी मध्यस्थी केल्यानतंर मृतदेह कुटुंबीयांनी ताब्यात घेतला. दरम्यान, रुग्णाच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी देखील कुटुंबीयांनी केली आहे.

याविषयीची अधिक माहिती अशी कि , भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील ऑर्डिनन्स फॅक्टरी येथील कर्मचारी व रहिवासी असलेली ४५ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित म्हणून डेडिकेटेड गणपती हॉस्पिटलमध्ये गेल्या १४ दिवसांपासून उपचार घेत होती. १४ दिवस उलटून देखील रुग्णाच्या प्रकृती विषयी रुग्णालयाने कुठलीच माहिती दिली नाही. गुरुवारी दुपारी साडेचार वाजता रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाने नातेवाईकांना कळविली. त्यानतंर नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. मृत्यू कशामुळे झाला याचे कुठलेही ठोस कारण रुग्णालय प्रशासनाने दिले नाही. दोन दिवसांपूर्वी रुग्ण चांगला होता, मग त्याचा मृत्यू झाला कसा, असा सवाल नातेवाईकांनी विचारला. त्यातच संध्याकाळी सहा वाजेनंतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होत नाही, असे सांगत रुग्णालयाने मृतदेह देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.

दरम्यान आज शुक्रवारी ११ वाजता नातेवाईक मृतदेह घेण्यास आले असताना त्यांना १ लाख ११ हजार रुपयांचे बिल बाकी आहे, ते आधी भरा, असे रुग्णालयाने सांगितले. मात्र आधीच ऑनलाइन २ लाख ४४ हजार तसेच ५० हजार रुपये रोख भरले असल्याने आणखी पैसे का द्यावे? अशी भूमिका मृत वक्तीच्या भावाने घेतली. त्यानंतर रुग्णालयाने बिल नातेवाईकांना दिले. त्यात २ लाख ४४ हजार व रोख ५० हजार जमा केल्याचा उल्लेख नव्हता. त्यामुळे नातेवाईकांचा आणखीन संताप झाला. यात औषधे व इंजेक्शन देखील डॉक्टरांना आम्हीच आणून दिले असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. ही माहीती नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांना मिळाल्यानतंर त्यांनी मृताच्या नातेवाईकांशी संवाद साधला. त्यांनी, घडलेल्या प्रकारविषयी तक्रार अर्ज द्या, रुग्णालयाचे लेखापरीक्षण केले जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. या प्रकारचे लेखापरीक्षण, मृत्यूपरीक्षण करावे, अशी तक्रार जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे केली जाणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. नोडल अधिकारी डॉ. एन. एस. चव्हाण यांच्याकडून या प्रकाराची माहिती मिळाली आहे. नातेवाईकांची तक्रार आल्यास पुढील चौकशी केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!